मुंबईतील ग्रँड हयात हॉटेलमध्ये महाविकास आघाडीने केलेल्या शक्ती प्रदर्शनावर भाजपाचे नेते राम माधव यांनी टीका केली आहे. सोमवारी संध्याकाळी हयात हॉटेलमध्ये शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांना पक्षासोबत एकनिष्ठ राहण्याची शपथ देण्यात आली. भाजपाकडून केला जाणार बहुमताचा दावा खोडून काढण्यासाठी महाविकास आघाडीने तिन्ही पक्षाच्या आमदारांना एकत्र आणून अशा प्रकारचे शक्ती प्रदर्शन केले.

आम्ही सर्व मिळून १६२ असल्याचा दावा महाविकास आघाडीने केला आहे. भाजपाचे नेते राम माधव यांनी आमदारांना शपथ देण्याच्या या कार्यक्रमावर टीका केली आहे. “बहुमत हे सभागृहाच्या पटलावर सिद्ध करायचे असते. हॉटेल ही बहुमत सिद्ध करण्याची जागा नाही. महाराष्ट्रात विधानसभेत आमचे सरकार बहुमत सिद्ध करुन दाखवेल” असा विश्वास राम माधव यांनी व्यक्त केला.

महाराष्ट्रात सुरु असलेल्या सत्ता संघर्षावर उद्या पडदा पडण्याची शक्यता आहे. सर्वोच्च न्यायालयाने उद्या २७ नोव्हेंबर रोजी विधानसभेत बहुमत चाचणी घेण्याचे आदेश दिले आहेत. उद्या पाच वाजेपर्यंत आमदारांचे शपथविधी पूर्ण करण्याचेही तसेच या मतदानाचे थेट प्रक्षेपण करण्याचेही आदेश न्यायालयाने दिले आहेत.

“लोकशाही मूल्यांचं रक्षण होणं आवश्यक आहे. लोकांना चांगलं सरकार मिळणं हा मुलभूत अधिकार आहे. तसेच घोडेबाजार रोखण्यासाठी न्यायालयाला काही आदेश देणे गरजेचे आहे. त्यामुळे कोणतेही गुप्त मतदान न घेता उद्या (२७ नोव्हेंबर) सायंकाळी पाच वाजेपर्यंत बहुमत चाचणी घेण्याचे आदेश आम्ही देत आहोत,” असं न्यायाधिशांनी स्पष्ट केलं.