शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हेच महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री असतील यावर आज महाविकास आघाडीने शिक्कामोर्तब केलं. त्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या शपथविधीचा मुहूर्तही ठरला.  1 डिसेंबर रोजी उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत. या शपथविधी सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनाही निमंत्रण दिलं जाणार असल्याची माहिती शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिली.

 

महाविकास आघाडीची बैठक ट्रायडंट हॉटेलमध्ये पार पडली. या बैठकीत तीन पक्षांचे नेते हजर होते. यावेळी उद्धव ठाकरे यांच्या नावाचं अनुमोदन देण्यात आलं. ते महाविकास आघाडीच्या सगळ्या नेत्यांनी मान्य केलं. ही बैठक संपल्यानंतर सत्तास्थापनेचा दावा करण्यात आला. महाविकास आघाडीचे नेते राज्यपालांच्या भेटीला गेले. त्यानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली.

शिवसेना खासदार संजय राऊत यांना जेव्हा विचारण्यात आलं तेव्हा आम्ही सगळ्यांना बोलवणार आहोत. पंतप्रधान नरेंद्र मोदींना शपथविधीसाठी बोलवणार का? असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी आम्ही सगळ्यांना बोलवणार आहोत अगदी अमित शाह यांनाही शपथविधीचं निमंत्रण देणार आहोत असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.