गॅस एजन्सीवर कारवाई न करण्यासाठी दीड लाखांची लाच घेतल्या प्रकरणी लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यातील सहायक फौजदारासह एकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) पकडले. ‘एसीबी’ने पोलीस ठाण्यात टाकलेल्या छाप्यानंतर लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रवीण मोरे पसार झाले आहेत. मोरे यांच्या विरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणी पोलीस निरीक्षक प्रवीण बाळासाहेब मोरे (वय ५०), सहायक फौजदार कुतबुद्दीन गुलाब खान (वय ५२) आणि मध्यस्थ यासीन कासम शेख (वय ५८) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लोणावळा परिसरातील एका गॅस एजन्सीवर गुन्हा दाखल न करण्यासाठी सहायक फौजदार कुतबुद्दीन खानने दोन लाख रुपयांची लाच मागितली होती. तडजोडीत गॅस एजन्सीच्या मालकाने दीड लाख रुपये देण्याचे मान्य केले. खान याने त्याच्या ओळखीतील यासीन शेखला वाकसाई परिसरात दीड लाखांची लाच घेण्यासाठी पाठविले. त्यानंतर गॅस एजन्सीच्या मालकाने याबाबत ‘एसीबी’च्या पुणे कार्यालयात तक्रार दिली. तक्रारीची शहानिशा करण्यात आली आणि वाकसाई परिसरात सापळा लावण्यात आला. शेखला दीड लाख रुपयांची लाच घेताना पकडण्यात आले. शेखची चौकशी करण्यात आली. तेव्हा खानने लाच घेण्यासाठी पाठविल्याचे उघड झाले. त्यानंतर खान आणि शेख यांना ताब्यात घेऊन अटक करण्यात आली.

चौकशीत लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षक प्रवीण मोरे यांनी लाच घेण्यास सांगितल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर मोरे यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला. ‘एसीबी’च्या कारवाईनंतर पोलीस निरीक्षक मोरे पसार झाले असून त्यांचा शोध घेण्यात येत आहे. ‘एसीबी’चे पोलीस अधीक्षक राजेश बनसोडे, अतिरिक्त अधीक्षक सूरज गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली उपअधीक्षक विजयमाला पवार, पोलीस निरीक्षक प्रवीण निंबाळकर,सहायक फाैजदार मुश्ताक खान, अंकुश आंबेकर, सौरभ महाशब्दे, पूजा डेरे आदींनी ही कारवाई केली.