प्रबोध देशपांडे
अकोला : अमरावती ते चिखलीपर्यंत राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरणाचे काम प्रथम मंजुरीनंतर ते पूर्ण होण्यास १० वर्षांचा कालावधी लागणार आहे. विविध अडचणींमुळे अतिशय संथ गतीने सुरू असलेल्या कामात लोणी ते मूर्तिजापूर ४० कि.मी. रस्त्यावर डांबरीकरणाचा थर देण्याचा विश्वविक्रमाचा घाट घालण्यात आला. त्या विक्रमासाठी सर्व खटाटोप करून मोठा गाजावाजा करण्यात आला. कागदोपत्री हा विक्रम रचला गेला असला तरी अगोदरच्या कासवगतीवरून आता हे काम समाज माध्यमात ‘ट्रोल’ होत आहे. १९४ कि.मी.च्या कामासाठी तब्बल १० वर्षांचा कालावधी लागला, याची देखील विश्वविक्रमात नोंद करावी, अशी उपहासात्मक टीका नागरिकांमधून केली जात आहे.




राष्ट्रीय महामार्गावरील अमरावती ते चिखली (नांदुरा अगोदरचे गाव) १९४ कि.मी. चौपदरीकरणाला २०१३ मध्ये मंजुरी मिळाली होती. कंत्राट मिळालेल्या एल अँड टी कंपनीने कार्यारंभ होण्यापूर्वीच काम सोडले. केंद्रातील सत्ता परिवर्तनानंतर केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी ऑक्टोबर २०१५ मध्ये चौपदरीकरणाच्या कामाचे दुसऱ्यांदा भूमिपूजन केले. मात्र, या रस्त्यामागील शुक्लकाष्ट काही संपले नाही. काम सुरू झाल्यानंतर कंत्राटदार आयएल अँड एफएस कंपनी आर्थिक डबघाईस आल्याने अर्धवट अवस्थेत २०१७ मध्ये काम बंद पडले.
अर्धवट अवस्थेतील रस्त्यामुळे झालेल्या अपघातांमध्ये शेकडो बळी गेले. या रस्त्याच्या कामाकडे कायम दुर्लक्ष झाले. ‘बीओटी’वर काम करणे अडचणीचे झाल्याने ‘हायब्रीड अॅन्युटी’ तत्त्वावर तब्बल चार वर्षानंतर २०२१ मध्ये चार टप्पातील काम तीन कंत्राटदार कंपन्यांना देण्यात आले. तरीही बडनेरा ते अकोलापर्यंतच्या कामाची संथगती कायमच राहिली. केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना स्वतः या कामावरून दिलगिरी व्यक्त करावी लागली. आतापर्यंत धिम्या गतीने काम करणाऱ्या राज पथ इन्फ्रा. या कंत्राटदार कंपनीकडून अचानक विश्वविक्रमी काम करणार असल्याचे जाहीर करण्यात आले.
रस्ता निर्मिती की केवळ डांबरीकरणाचा थर?
५ दिवसांत ४० कि.मी. रस्त्याच्या डांबरीकरण कामाचे नियोजन करण्यात आले. यामध्ये केवळ रस्त्यावर शेवटचा डांबरीकरणचा थर देण्याचा समावेश होता. पूर्ण मूळापासून रस्ता निर्मितीचे काम नव्हते. कारण त्या रस्त्याचा मूळापासूनचा ‘बेस’ अगोदरच संपूर्ण तयार होता. आधीच्या कंत्राटदार कंपनीने देखील त्या रस्त्याचे काम केले होते. फक्त ४० कि.मी.च्या रस्त्यावर ते पण एकाच बाजूने डांबरीकरणाचा थर टाकण्यात आला. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्ताचे गोंडस नाव देऊन ७५ कि.मी. रस्ता निर्मितीची घोषणा करण्यात आली होती. एकाच बाजूने डांबरीकरण थराचे दुपदरी मिळून हे लक्ष्य गाठण्यात आले.
पुढे काम सुरळीत चालल्यास संपूर्ण रस्त्याचे चौपदरीकरण होण्यासाठी करारानुसार आणखी किमान एक वर्षांचा कालावधी लागणार आहे. म्हणजे प्रथम मंजुरीच्या १० वर्षांनंतर चौपदरीकरणाचे काम पूर्ण होणार आहे. मग या विश्वविक्रमाचे कौतुक करावे की चौपदरीकरणाला १० वर्षे लागत असल्याची खंत व्यक्त करावी, असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे.