महाराष्ट्र राज्यातील साखर कारखाना कामगारांच्या मागण्यांवर विचार करण्यासाठी त्रिपक्षीय समिती स्थापन करण्यात आली होती. या समितीच्या बैठकांमध्ये राज्यातील साखर कारखान्यांमधील कामगारांच्या मागण्याबाबत सामजंस्य करार करण्यात होता. हा करार महाराष्ट्रातील साखर व उपपदार्थ उद्योगातील दिनांक १ एप्रिल २०१९ व त्यानंतर हजेरी पत्रकावर असलेल्या सर्व कायम, हंगामी कायम व हंगामी कामगारांना लागू करण्यात आला आहे. या करारानुसार आता या कामगारांना अस्तित्वात असलेल्या मूळ पगार, महागाई भत्ता, स्थिर भत्ता मिळून १२ टक्के पगारवाढ करण्यात आली आहे. त्यामुळे राज्यातील सर्व साखर कामगारांची दिवाळी गोड झाली असल्याची भावना ग्रामविकास व कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केली आहे. याबाबतचा शासन निर्णय आज निर्गमित करण्यात आला आहे.

या निर्णयान्वये दिनांक १ एप्रिल २०१९ रोजी संबंधित कामगारांच्या वेतनश्रेणीत १२ टक्के पगारवाढ म्हणजे अस्तिवात असलेल्या पगाराच्या १२ टक्के देण्यात येणार आहे. या शिवाय फिटमेंट बेनिफिट देण्यात येणार आहे. तृतीय वेतन मंडळाने सूचविलेली वर्गवारी व वेतनश्रेणी आणि स्थिर भत्ता यापूर्वी स्वीकारण्यात आले आहे. त्यात स्थिर भत्ता पूर्ण रूपयात करून घेतलेला आहे. त्याचबरोबर महाराष्ट्र कामगार किमान घरभाडे भत्ता अधिनियम-१९८३ अन्वये घरभाडे भत्ता प्रदान करण्यात येणार आहे. तथापि, जे कामगार / कर्मचारी कारखान्यामार्फत दिलेल्या घरात राहतात, त्याला घरभाडे भत्ता देय नसणार आहे.

उपरोक्त शासन निर्णयानुसार दिनांक १ एप्रिल २०१९ पासून रात्रपाळीत (तिसरी पाळी) काम करणाऱ्यांना/हजर असलेल्या प्रत्येक रात्रीपाळीसाठी २६ रूपये प्रमाणे रात्रपाळी भत्ता प्रचलित पद्धतीनुसार लागू करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे सर्व कामगारांना ग्रेडप्रमाणे दरमहा धुलाई भत्ता आणि दरमहा ३०८ रूपये वैद्यकीय भत्ता देय करण्यात आला आहे. स्त्री कामगारांना मॅटर्निटी बेनिफिट अधिनियमानुसार रजा देय करण्यात आली असून अनुकंपा धोरण लागू करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे रजा व पगार सुट्ट्या, गणवेश वाटप, प्रवासभत्ता, वाहनभत्ता, दैनिक भत्ता, ग्रुप ग्रॅच्युईटी विमा योजना, कायमस्वरूपी वैद्यकीय अधिकारी, कारखान्याच्या विश्रामगृह सवलती आदी लागू करण्यात आला आहे.

उपरोक्त शासन निर्णय शासनाच्या संकेतस्थळावर अपलोड करण्यात आला असून त्याचा संकेतांक 202110291551231310 असा आहे. या शासन निर्णयाने कामगारांचे हित जपले असून सर्व कामगार आणि कारखान्यामधील कर्मचाऱ्यांना एक आत्मविश्वासाची भावना निर्माण होणार असल्याचे कामगार मंत्री मुश्रीफ यांनी म्हटले आहे.