बुलढाणा जिल्ह्याच्या खामगाव तालुक्यातील शिवाजी नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. घराच्या पाठीमागे खेळायला गेलेल्या एका १२ वर्षीय मुलाचा भयावह अंत झाला आहे. गळफास लागल्याने त्याचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. या घटनेची नोंद शिवाजी नगर पोलीस ठाण्यात करण्यात आली असून घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

पूर्वेश वंदेश आवटे असं मृत पावलेल्या १२ वर्षीय मुलाचं नाव आहे. मृत पूर्वेश हा त्याच्या आईवडिलांचा एकुलता एक मुलगा होता. पूर्वेशचे वडील एका खासगी कंपनीत काम करतात, तर फावल्या वेळेत भाजीपाला विक्रीचा व्यवसाय करतात. दोन वर्षांपूर्वी पूर्वेशच्या बहिणीचा देखील मृत्यू झाला आहे. अशात १२ वर्षीय मुलाचाही मृत्यू झाल्याने आवटे दाम्पत्याला धक्का बसला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, घटनेच्या दिवशी मंगळवारी मृत पूर्वेशचे वडील कंपनीत कामाला गेले होते. दरम्यान तो आणि त्याची आई दोघेच घरी होते. त्यावेळी पूर्वेश बाहेर खेळायला जातो, असं सांगून घराच्या मागच्या बाजूला गेला होता. येथील एका लोखंडी पाईपला त्यानं रुमाल बांधला आणि त्याच्यासोबत खेळू लागला. खेळत असताना अचानक त्याला फास लागला. ही बाब त्याच्या आईच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी त्याला तातडीने खाली उतरवलं आणि घटनेची माहिती मुलाच्या वडिलांना दिली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

त्यानंतर दोघांनी त्वरित त्याला उपचारासाठी रुग्णालयात नेलं. मात्र डॉक्टरांनी प्राथमिक तपासणी करत पूर्वेशला मृत घोषित केलं. पूर्वेशला मोबाइलवर गेम खेळण्याची आवड होती. मोबाइल गेम आणि युट्यूबवरील साहसी व्हिडीओ पाहून तशीच कृती करण्याचा तो सतत प्रयत्न करायचा. त्याच्या याच छंदामुळे त्याला गळफास लागला असावा, अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे. या घटनेचा पुढील तपास केला जात आहे.