वैनगंगा नदीच्या पात्रात मंडईनिमित्त प्रवासी घेऊन जाणारी नौका उलटून बुडालेल्या १३ जणांचे मृतदेह गुरुवारी सायंकाळी हाती लागले असून अजूनही काही जण बेपत्ता आहेत. यातील दहा जणांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आले. या नौकेत ३० जण होते. तिरोडा तालुक्यातील घाटकुरोडा व तुमसर तालुक्यातील उंबरवाडा या दोन गावांना जोडणाऱ्या वैनगंगा नदीच्या पात्रात बुधवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास ही घटना घडली.
 पौर्णिमा ताराचंद बागडे (१६, रा. उमरवाडा), कैलाश तेजराम कांबळे (२७, रा. तुमसर), विशाल राजेश देशकर (१७, रा. छोटा गोंदिया), प्रमिला प्रभु झेलकर (४०, रा. उमरवाडा), कौशल्य आसाराम बागडे (४०, रा. उमरवाडा), तेजु भगवान उके (१,), रेखा प्रदीप राऊत (३०), तुकाराम दुलीचंद भोंगाडे (३५, रा. तुमसर), तुषार प्रदीप राऊत (११), उषा अशोक बोरघरे (१४), वंदना रतीराम शेंडे (१०), विशाल सेवक मेश्राम (११) व शीतल कैलाश कांबळे (२४, रा. तुमसर) या १३ जणांचे मृतदेह सापडले आहेत. शांताबाई गिरडकर (५०, रा. उमरवाडा, तुमसर) व रानू प्रदीप राऊत (११, रा. तुमसर) या दोन जखमींना तिरोडा येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
नौकेत असलेला दीपक रतीराम शेंडे (८) हा मुलगा अद्याप बेपत्ता असून त्याचा शोध घेतला जात आहे.