नांदेड राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या १२ वीच्या वार्षिक परीक्षा दि. ११ फेब्रुवारीपासून सुरु झाल्या आहेत. शनिवार (दि. २२) गणित विषयाचा पेपर होता. या पेपरच्या वेळी भरारी पथकाच्या तपासणीत १३ विद्यार्थी कॉपी करताना आढळून आल्यामुळे त्यांना रस्टीकेट करण्यात आले आहे.

बारावीचा शनिवारी ११ ते २ या वेळेत गणित विषयाचा पेपर होता. जिल्ह्यात १०७ केंद्रावर परिक्षा सुरू असून गणिताच्या  पेपरला एकूण १७ हजार ४९१ विद्यार्थी होते. त्यापैकी १७ हजार २३४ विद्यार्थ्यांनी पेपर दिला. २५७ विद्यार्थी गैरहजर राहिले. तर १३ विद्यार्थ्यांवर रस्टीकेटची कारवाई करण्यात आली. त्यामध्ये बरबडा येथील जवाहरलाल नेहरू कॉलेज केंद्रातील एक विद्यार्थी, कंधारमधील नंदकुमार बिडवई विद्यालय केंद्रावरील दोन तर नांदेड शहरालगत असलेल्या वाजेगाव येथील राष्ट्रमाता विद्यालय केंद्रातील दहा विद्यार्थ्यांचा समावेश आहे. बरबडा येथे शिक्षणाधिकारी (माध्यमिक), कंधारला जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी तर वाजेगावला योजना विभागाचे उपशिक्षणाधिकारी यांच्या पथकाने कारवाई केली.

दरम्यान, कॉपीमुक्त वातावरणात परीक्षा व्हाव्यात, यासाठी जिल्हाधिकारी राहुल कर्डीले, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल व जिल्हा पोलीस अधीक्षक अबिनाशकुमार परीक्षा सुरु झाल्यापासून परीक्षा केंद्राना भेटी देत आहेत. महसूल विभाग, जिल्हा परिषद आणि जिल्ह्यातील विविध विभागाचे विभाग प्रमुख अधिकारी परीक्षा केंद्राना भेटी देत आहेत.

राज्य शिक्षण मंडळाच्यावतीने इयत्ता दहावीच्या वार्षिक परीक्षा दि. २१ फेब्रुवारी पासून सुरू झाल्या आहेत. दहावीच्या परीक्षा दि. १७ मार्च पर्यंत घेण्यात येणार आहेत. इयत्ता दहावीच्या वार्षिक परीक्षेचे नियोजन करण्यात आले असून जिल्ह्यातील १७२ परीक्षा केंद्रावर ४८ हजार पेक्षा जास्त विद्यार्थी परीक्षा देणार असून १७२ बैठे पथक असणार आहेत. तालुका स्तरावरील विभागप्रमुख यांचे भरारी पथक आणि जिल्हा स्तरावरील भरारी पथक परीक्षा केंद्राना भेटी देणार आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

परीक्षा केंद्र परिसरात जमावबंदी परीक्षार्थी विद्यार्थ्यांनी कॉपीमुक्त व आनंददायी वातावरणात परीक्षा द्यावी. आपले भविष्य उज्वल करण्यासाठी गुणवत्ता पूर्ण शिक्षण खूप महत्वाचे आहे. परीक्षा केंद्र परिसरात जमावबंदीचे कलम लागू असल्याने पालक व इतर नागरिकांनी परीक्षा केंद्र परिसरात अजिबात थांबू नये तसेच झेरॉक्स मशीन किंवा इतर इलेक्ट्रॉनिक साहित्य सुरु ठेऊ नये, असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.