‘सावाना’चा १७३ वा वार्षिकोत्सव
डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांचे प्रतिपादन
इंग्रज भारतात येण्यापूर्वी ज्ञान हे विशिष्ट घराणी व जातींमध्ये बंदिस्त असल्याने ते मर्यादित होते. इंग्रजांनी ज्ञानाचे सार्वजनिकीकरण केल्याने त्याच्या कक्षा रुंदावल्या, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांनी केले. येथील सार्वजनिक वाचनालयाच्या १७३ व्या वार्षिकोत्सवात देण्यात येणाऱ्या विविध वाङ्मयीन पुरस्कार प्रदान सोहळ्यात ते बोलत होते.
परशुराम साईखेडकर नाटय़मंदिरात आयोजित सोहळ्यात वाचनालयाच्या वतीने कोत्तापल्ले यांच्या हस्ते डॉ. वि. म. गोगटे पुरस्कार डॉ. सुलभा ब्रह्मानाळकर, डॉ. अ. वा. वर्टी पुरस्कार नीलिमा बोरवणकर यांना देण्यात आला. तर मु. ब. यंदे स्मृती पुरस्कार दिवंगत धनंजय कुलकर्णी यांच्या वतीने त्यांची पत्नी अंजली कुलकर्णी यांनी स्वीकारला. ग. वि. अकोलकर स्मृती पुरस्कार आसावरी काकडे यांच्या वतीने राजहंस प्रकाशनचे नाशिक प्रतिनिधी पंकज क्षेमकल्याणी यांनी स्वीकारला. पु. ना. पंडित पुरस्कार जाहीर झालेले मिलिंद जोशी समारंभाला उपस्थित राहू शकले नाहीत. सत्काराला उत्तर देताना डॉ. ब्रह्मानाळकर यांनी लेखनासाठीचा हा पहिलाच पुरस्कार असून तो अनमोल असल्याची भावना व्यक्त केली. बोरवणकर यांनीही आत्यंतिक ऊर्मीतून लेखन प्रवास घडल्याचे नमूद केले.
कोत्तापल्ले यांनी लोकहितवादींच्या शतपत्रात सार्वजनिक वाचनालयाची नोंद दिसून येत असल्याचा उल्लेख केला.
लोकहितवादींनी लेखकांना भानावर आणण्याचे काम केले. समाज मध्ययुगातून बाहेर पडावा असे त्यांचे मत होते. पूर्वी विविध विद्याशाखा बंदिस्त होत्या. त्यामुळे त्यांचा विकास झाला नाही. ज्ञानामुळे माणूस विचार करायला सक्षम होतो. विचारी लोकच समाजाला दिशा देऊ शकतात. ही ताकद त्यांना वाचनातून मिळते. समाजभान ठेवून लिहिणारे लेखक व कवींची शासनाला, सत्ताधाऱ्यांना भीती वाटते, असे सामाजिक संवेदना जागे करणारे लेखन व्हायला पाहिजे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
सूत्रसंचालन नंदन रहाणे यांनी केले. प्रास्ताविक नरेश महाजन यांनी केले. सावानाचे वार्षिक अहवाल वाचन कर्नल आनंद देशपांडे यांनी केले. सावानाचे अध्यक्ष प्रा. विलास औरंगाबादकर या वेळी उपस्थित होते.
संग्रहित लेख, दिनांक 27th Apr 2013 रोजी प्रकाशित
सार्वजनिकीकरणामुळे ज्ञानाच्या कक्षा रुंदावल्या
‘सावाना’चा १७३ वा वार्षिकोत्सव डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांचे प्रतिपादन इंग्रज भारतात येण्यापूर्वी ज्ञान हे विशिष्ट घराणी व जातींमध्ये बंदिस्त असल्याने ते मर्यादित होते. इंग्रजांनी ज्ञानाचे सार्वजनिकीकरण केल्याने त्याच्या कक्षा रुंदावल्या, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांनी केले.
First published on: 27-04-2013 at 04:12 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 173 yearly festival of savana