माणगाव येथे गुटखानिर्मिती करणाऱ्या टोळीस रायगड पोलिसांनी जेरबंद केले आहे. या टोळीकडून २ कोटी ३२ लाख ७० हजार रुपयांचा गुटखा हस्तगत करण्यात आला आहे. या प्रकरणी माणगाव पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून सहा जणांना अटक करण्यात आली आहे.
माणगाव मोर्बा रस्त्यावर एका घरात हा गुटखा बनवला जात होता. याबाबत माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी ‘मून होम ट्रेडिंग अ‍ॅण्ड एक्स्पोर्ट प्रायव्हेट लिमिटेड’ कंपनीवर छापा टाकला. या वेळी घरातील तीन गोदामांमध्ये तब्बल २ कोटी ३२ लाख ७० हजारांचा गुटखा आढळून आला. अन्न-औषध प्रशासन आणि पोलीस यांनी संयुक्तपणे धाड टाकून ही कंपनी उद्ध्वस्त केली. या कंपनीत गोवा १००० आणि रॉकेट अशा दोन प्रकारचा गुटखा बनवला जात होता. तर कंपनीत गुटखा तयार करण्यासाठी ३० कामगारांना उत्तर प्रदेश आणि बिहारमधून आणण्यात आले होते. या सर्वाना पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.
निझाम हुजरक, फवाझ पारकर, मोहम्मद शेख, रिझवान शेख, इमरान मौमिन, फैयाझ शेख  या सहा जणांना या प्रकरणी अटक करण्यात आली आहे. या सर्वावर भारतीय दंड संहितेच्या कलम ३२८, २३७, १८८ आणि अन्नसुरक्षा मानक कायद्यानुसार कारवाई केली जाणार असल्याची माहिती निरीक्षक विनोद चव्हाण यांनी दिली आहे. घराचे मालक आणि गोवा आणि रॉकेट कंपन्याच्या मालकांचा यात हात आहे का, याचा तपास पोलीस करीत आहेत.
दरम्यान, राज्यातील दुर्गम भागात एखादा बंगला भाडय़ाने घ्यायचा आणि तिथे गुटख्याची निर्मिती करून तो चोरून राज्यात वितरित करण्याचा उद्योग या टोळीकडून केला जात असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. दरम्यान, गुटखा फॅक्टरी उद्ध्वस्त करण्याची ही राज्यातील पहिलीच कारवाई आहे.