सांगलीतील कुख्यात गुंड सचिन जाधव ऊर्फ सच्या टारझन याच्या टोळीतील दोघांना अटक करून सांगली पोलीसांनी शुक्रवारी ३२ जिवंत काडतूसासह ५ पिस्तूल हस्तगत केली. सांगलीतील एका आचार्याला शस्त्राचा धाक दाखवून लुटण्याचा दोनदा प्रकार घडल्यानंतर पोलिसांनी ही कारवाई केली असल्याचे अधीक्षक दिलीप सावंत व अतिरिक्त पोलीस अधीक्षक डॉ. दिगंबर प्रधान यांनी सांगितले.
अमोल सदाशिव काटे हा आचारी काम करणारा तरुण १०० फुटी रस्त्यावरून जात असताना फेब्रुवारी २०१४ मध्ये सचिन जाधव ऊर्फ सच्या टारझन याने साथीदार सोन्या ऊर्फ प्रसन्न पांडुरंग कुलकर्णी या दोघांनी पिस्तूलचा धाक दाखवून ८ हजार रुपये उकळले होते. या घटनेनंतर फिर्यादीला जीवे मारण्याची धमकी दिली होती. त्यानंतर गुरुवारी पुन्हा पाकीजा मस्जीद येथे सोन्या व सचिन पुराणीक ऊर्फ स्वामी यानी पुन्हा पिस्तूलचा धाक दाखवून ७ हजार रुपये उकळले.  या बाबत विश्रामबाग पोलीस ठाण्यात रीतसर फिर्याद दाखल करण्यात आली आहे.
स्थानिक गुन्हे अन्वेशन शाखेचे निरीक्षक बाळकृष्ण कदम व त्यांचे सहकारी अशोक डगळे, साईनाथ ठाकूर, जितेंद्र जाधव आदींच्या पथकाने आरोपीचा शोध घेऊन सोन्या कुलकर्णी व सचिन स्वामी या दोघांना अटक केली.  दोघांच्या राहत्या घरात झडती घेतली असता ३ देशी बनावटीची पिस्तुले व २ दोन देशी बनावटीचे रिव्हॉलव्हर आणि ३२ जिवंत काडतुसे असा ४ लाख २६ हजारांचा माल हस्तगत करण्यात आला. पोलीस अधीक्षकांनी या कामागिरीबद्दल पथकातील सहभागी महिला कर्मचारी माणिक केरीपाळे, स्नेहल िशदे यांच्यासह १५ कर्मचाऱ्यांना १५ हजारांचे बक्षीस जाहीर केले आहे.
सच्या टारझन याच्यावर राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक दाद्या सावंत याचा खून केल्याचा आरोप असून तो सध्या जामिनावर मुक्त आहे. दोन दिवसांपूर्वीच गावठी कट्टे विक्रीच्या प्रयत्नात असताना कराड पोलिसांनी त्याला अटक केली आहे. त्याचा जामीन रद्द करण्यासाठी न्यायालयात प्रयत्न करणार असल्याचे श्री. सावंत यांनी सांगितले. त्याच बरोबरच कराड पोलिसांकडून त्याला हस्तांतर करून घेण्यात येणार आहे.