शिर्डी येथील साईनगर रेल्वेस्थानकात झोपलेल्या दोन भिका-यांचा अज्ञात व्यक्तीने डोक्यात जड वस्तू मारून मध्यरात्री खून केला, तर एकजण गंभीर जखमी अवस्थेत आढळल्याने त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. गेल्या दोन महिन्यांतील ही चौथी घटना असून शिर्डीतही सीरियल किलिंगचे लोण पोहोचल्याने खळबळ उडाली आहे.
आज पहाटे साडेपाचच्या सुमारास साईनगर रेल्वेस्थानकाचे स्टेशनमास्तर डी. सी. बैरवा यांना केबीनपासून जवळच एक तरुण रक्तबंबाळ अवस्थेत पडलेला दिसला. त्यांनी अर्धवट शुद्धीत असलेल्या या जखमी तरुणाला तातडीने रुग्णालयात हलवले. त्यानंतर सकाळी स्वच्छता कर्मचा-यांना एका महिलेचा मृतदेह रेल्वेरुळाच्या शेजारी पडलेला दिसला, तर लगतच असलेल्या फलाटावर पुरुषाचा मृतदेह आढळला. या दोघांचे वय ६५ ते ७० च्या दरम्यान आहे. त्यांच्या डोक्यावर तीक्ष्ण अथवा जड वस्तूने मारहाण केल्याचे दिसत होते. या दोघांवरही झोपेतच हल्ला करण्यात आला. हे एखाद्या माथेफिरूचे कृत्य असावे असा अंदाज व्यक्त होतो. विशेष म्हणजे पुरुषाच्या मृतदेहाजवळ एक मोठा दगड होता. पोलिसांना या सीरियल किलरचा शोध घेण्यात अपयश येत असल्याने भविष्यात या घटनामध्ये वाढ होण्याची शक्यता व्यक्त होते.
जखमी तरुणाचे नाव रवींद्र गौतम असे असून तो काठमांडूचा (नेपाळ) आहे. आपण तीर्थाटन करत फिरतो. रात्री साईनगर रेल्वेस्थानकावर झोपलो होतो. डासांमुळे अंगावर लुंगी पांघरली होती. डोक्यात कुणीतरी काहीतरी मारले, पण समजले नाही व आपण कुणाला पाहिलेही नाही, अशी माहिती या जखमी तरुणाने रेल्वे पोलीस निरीक्षक रमेश तायडे, पंडित सुरनार, प्रदीप सायरे यांना दिली. याबाबत रेल्वेच्या मनमाड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बेवारस मृतदेहांची वाढती संख्या
शिर्डीत रोजीरोटीसाठी दररोज असंख्य लोक येतात. मिळेल ते काम करून संस्थानमध्ये मिळणा-या अवघ्या दहा जेवणामुळे या ठिकाणी राहण्यास सहज परवडते. शिर्डीत दर महिन्याला सात ते आठ बेवारस मृतदेह सापडतात. भीक मागण्यासाठी शिर्डीत येणा-यांचीही संख्या मोठी आहे. या लोकांचा मृत्यू झाल्यानंतर त्यांची ओळख पटवणे हे काम पोलिसांना जिकिरीचे ठरते. भीक मागणा-यांमध्ये अनेक वेळा वाद, प्रसंगी हाणामा-याही होतात. शिर्डीतील भिका-यांची वाढती संख्या ही एक मोठी समस्या ठरू पाहात आहे.
संग्रहित लेख, दिनांक 9th Jul 2013 रोजी प्रकाशित
दोन भिका-यांचा खून, तिसरा गंभीर जखमी
शिर्डी येथील साईनगर रेल्वेस्थानकात झोपलेल्या दोन भिका-यांचा अज्ञात व्यक्तीने डोक्यात जड वस्तू मारून मध्यरात्री खून केला, तर एकजण गंभीर जखमी अवस्थेत आढळल्याने त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले.

First published on: 09-07-2013 at 12:15 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 2 beggars murder one seriously injured