पंढरीत दिंडीत मोटार घुसल्याने दोघा वारक-यांचा मृत्यू; १० जखमी

पंढरपूरच्या आषाढी यात्रेसाठी पंढरपूरजवळ आलेल्या वारक-यांच्या दिंडीत मोटार घुसल्याने घडलेल्या अपघातात दोघा वारक-यांचा जागीच मृत्यू झाला, तर अन्य दहा वारकरी जखमी झाले.

पंढरपूरच्या आषाढी यात्रेसाठी पंढरपूरजवळ आलेल्या वारक-यांच्या दिंडीत मोटार घुसल्याने घडलेल्या अपघातात दोघा वारक-यांचा जागीच मृत्यू झाला, तर अन्य दहा वारकरी जखमी झाले. पंढरपूरच्या अलीकडे अवघ्या दोन किलोमीटर अंतरावर रात्री सव्वादहाच्या सुमारास हा अपघात झाला. मोटारचालकाविरुद्ध पंढरपूर तालुका पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. यातील दोघेही मृत व सर्व जखमी हे अमरावती व वर्धा जिल्हय़ातील राहणारे आहेत.
उमेश मारुतराव बावनखडे (२६) व इंदुबाई धोत्रे (५०) अशी दोघा मृतांची नावे आहेत. तर जखमींमध्ये श्रीराम नारायण दुर्गे (२४), कांता किरण मुळे (३५), शोभा गोकुळ चव्हाण (४०), पद्माकर विनोदराव दसरे (२७), कमल बबनराव वायस्का (४५), आशा रमेश आखरे (३५), ललिता प्रल्हाद पोहेकर (५६), पुष्पा कुंडलिकराव पाटील, सरूबाई सुरेश राठोड (५०) यांचा समावेश आहे. यातील चौघांची प्रकृती गंभीर असून त्यांना सोलापूरच्या छत्रपती शिवाजी शासकीय सवरेपचार रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अमरावती येथून निघालेल्या रुक्मिणीमाता संस्थेच्या दिंडीतून हे सर्व वारकरी सहभागी झाले होते. मजल दरमजल करीत ही दिंडी पंढरपूरजवळ आली असतानाच दुर्दैवाने ही दुर्घटना घडली. ही दिंडी विठ्ठलाचा नामघोष करीत येत असताना टेम्पो व मोटारीची समोरासमोर धडक बसली आणि मोटार विरुद्ध दिशेला फिरून वारक-यांच्या दिंडीत घुसली.
दरम्यान, मोहोळ तालुक्यातील शेटफळ ते पंढरपूर रस्त्यावर शुक्रवारी दुपारी झालेल्या एका वाहन अपघातात एका वारक-याचा मृत्यू झाला, तर अन्य दोघे वारकरी जखमी झाल्याचे वृत्त आहे. मृत व जखमी वारकरी हे एका दिंडीत सहभागी होऊन पंढरपूरकडे पायी चालत निघाले होते. मृत व जखमींची नावे लगेचच समजू शकली नाहीत.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: 2 killed 10 injured in motor accident in pandharpur

Next Story
कानपिचक्या, कोपरखळय़ा आणि उपदेशाचे डोस..
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी