चंद्रपूर : वणी येथून विटा खाली करून भद्रावतीकडे परत येत असलेल्या मिनी ट्रकला आडवा आलेल्या कुत्र्याला वाचवण्याच्या प्रयत्नात चालकाने जोरदार ब्रेक दाबल्याने ट्रक अनियंत्रित होऊन उलटला. त्यामुळे दोन मजूर जागीच ठार झाले तर, चार मजूर गंभीर जखमी झाले. ही घटना बुधवारी दुपारी तीन वाजता नागपूर- चंद्रपूर महामार्गावरील डॉली पेट्रोल पंपाजवळ घडली.

जखमी मजुरांना जिल्हा सामान्य रुग्णालयात हलवण्यात आले आहे. विजय जांभुळे (३१), घनश्याम गजभिये (४०), असे मरण पावलेल्यांची नावे आहेत, तर वासुदेव काशिनाथ चिकटे (३४), भारत कचरू जिवतोडे (३०), अनिल वामन खोब्रागडे (४१) आणि मंगेश झाडे (३१), असे गंभीर जखमी असलेल्या मजुरांची नावे आहेत. खापरी येथील वैभव कुत्तरमारे याच्या मिनी ट्रकने सुधीर पारोधे यांच्या विट भट्टीवरून वणी येथे विटा पोहोचवून भद्रावतीकडे परत येत असताना पेट्रोल पंपाजवळ कुत्रा आडवा आला. त्याला वाचवण्याच्या नादात चालकाने गाडीचा करकचून ब्रेक दाबला. त्यामुळे ट्रक अनियंत्रित होऊन उलटला. अधिक तपास भद्रावती पोलीस करीत आहे.