महापालिकेवर सत्ता प्रस्थापित होताच पालिकेला रस्ते आणि सार्वजनिक रुग्णालयांच्या उभारणीसाठी २० कोटींचे अनुदान उपलब्ध करून देण्याचे आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहे. अनुदानासंदर्भात मुंबई येथे आयोजित बैठकीत उपमुख्यमंत्र्यांनी ही माहिती दिली.
नगरविकास राज्यमंत्री उदय सामंत, माजी आमदार राजवर्धन कदमबांडे, महापौर जयश्री अहिरराव, वित्त विभागाचे मुख्य सचिव के. शिवाजी आदी या वेळी उपस्थित होते. महापालिका ताब्यात आल्यानंतर राष्ट्रवादीने शहर विकासाकडे लक्ष देण्यास गांभीर्याने सुरुवात केली आहे.
 ८० फुटी रस्ता येथे प्रसूती रुग्णालय तसेच चक्करबर्डी परिसरात सार्वजनिक रुग्णालय बांधण्यासाठी प्रत्येकी पाच कोटी रुपयांची आवश्यकता आहे. तसेच शहरातील मुख्य रस्त्यांसाठी १० कोटींची गरज असल्याचे कदमबांडे यांनी उपमुख्यमंत्र्यांच्या नजरेस आणून दिले. त्यावर सांगली महापालिकेच्या धर्तीवर हे अनुदान उपलब्ध करून देण्यासाठी प्रस्ताव तयार करण्यात येईल, असे अजित पवार यांनी आश्वासन दिले. भूमिगत गटारींची व्यवस्था असलेल्या रस्त्यांची कामे या अनुदानातून करावीत, असेही त्यांनी सुचविले. महापालिकेने वाढत्या लोकसंख्येचा विचार करून विकास आराखडा शासनास सादर करावा, शहराच्या आवश्यकतेनुसार उद्यान, क्रीडांगण, शाळा, वीज उपकेंद्र या सर्वासाठीच्या जागांच्या आरक्षणाचा त्यात समावेश असण्याची गरज आहे. शहरातील यंत्रमागधारकांचे नुकसान टाळण्यासाठी काही अटींवर भारनियमन बंद करण्याचीही तयारी त्यांनी दर्शविली.