कराड : पाटण तालुक्यात अनधिकृत गौण खनिज उत्खनन व वाहतूक करणाऱ्यांना पाटणचे तहसीलदार अनंत गुरव यांनी दणका दिला. या प्रकरणी २० जणांना तब्बल २० लाख ५८ हजार २० रुपयांचा दंड आकारण्यात आल्याने अनधिकृत गौण खनिज उत्खनन करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. प्रांताधिकारी सोपान टोम्पे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली आहे.
पाटण तालुक्यात गेल्या काही महिन्यांपासून वीटभट्टींसाठी माती, मुरूम उत्खनन केले जात आहे. मात्र, हे उत्खनन करत असताना अनेकांनी महसूल विभागाकडून परवानगी घेत स्वामित्वधन भरून उत्खनन केले आहे. मात्र, काहीजण शासनाच्या डोळ्यात धूळफेक करून स्वामित्वधन न भरता, शासनाची परवानगी न घेताच रात्री-अपरात्री, दिवसाढवळ्या अनधिकृतपणे माती, मुरूम उत्खनन करत होते. अशांना पाटणच्या महसूल विभागाने चांगलाच दणका दिला आहे.
अनधिकृत गौण खनिज उत्खनन व वाहतूक प्रकरणी कोळेवाडी, तारूख, कातवडी, नेरळे, मलकापूर, सांगवड, सिद्धेश्वरनगर, म्हावशी, मूळगाव, चिटेघर, मल्हारपेठ, निसरे, उंब्रज, उत्तर तांबवे, काळोली आदी ठिकाणांसह वाहतूक प्रकरणी दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. त्यांच्याकडून एकूण २० लाख ५८ हजार २० रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे. याशिवाय सध्या पाटणपासून ते कोयना नगरपर्यंतच्या रखडलेल्या रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम सुरू आहे. या कामासाठी ऑल ग्रेस प्रा. लि. दिल्ली या कंपनीनेही परवानगी न घेता व स्वामित्वधन न भरता मुरूम उत्खनन केले आहे. या कंपनीलाही पाटणच्या महसूल विभागाने चांगलाच दणका दिला आहे. या कंपनीला १३ लाख ५६ हजार ६०० हजारांचा दंड केला आहे.