पीक विम्याची भरपाई दिवाळीपूर्वी ; राज्यातील २१ लाख शेतकऱ्यांना लाभ

जुलैमध्ये पावसाने दडी मारल्याने तसेच सप्टेंबरमध्ये अतिवृष्टीमुळे शेतीचे मोठे नुकसान झाले.

मुंबई : सुमारे २१ लाख शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी पीक विम्याची रक्कम देण्याच्या राज्य सरकारच्या सूचनेनंतर काही विमा कंपन्यांनी भरपाई वितरण सुरू केल्याची माहिती कृषिमंत्री दादा भुसे यांनी रविवारी दिली.

अतिवृष्टी तसेच अवर्षण यामुळे यंदाच्या खरीप हंगामात शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. अशा ३८ लाख शेतकऱ्यांनी पीक विम्याची नुकसानभरपाईची मागणी केली आहे. त्यापैकी नुकसानभरपाई निश्चित झालेल्या २१ लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर १५५५ कोटींची मदतीची रक्कम दिवाळीपूर्वी जमा करावी, अशी सूचना राज्य सरकारने विमा कंपन्यांना केली. त्यानंतर काही विमा कंपन्यांनी नुकसानभरपाई वितरण सुरू केल्याने लाखो शेतकऱ्यांची दिवाळी गोड होईल, अशी अपेक्षा भुसे यांनी व्यक्त केली.

जुलैमध्ये पावसाने दडी मारल्याने तसेच सप्टेंबरमध्ये अतिवृष्टीमुळे शेतीचे मोठे नुकसान झाले. त्यामुळे हवालदिल झालेल्या ३८ लाख शेतकऱ्यांनी विमा कंपन्यांकडे नुकसानभरपाईची मागणी केली आहे. तांत्रिक कारणे पुढे करून शेतकऱ्यांना विमा नाकारणाऱ्या कंपन्यांना लगाम घालण्याची खबरदारी सरकारने घेतली आहे. गेल्यावर्षीच्या खरीप हंगामात शेतकऱ्यांसाठी ५, ८०० कोटींचा पिक विमा उतरविण्यात आला होता. विमा कं पन्यांनी मात्र नियमांवर बोट ठेवत तसेच तांत्रिक मुद्दे उपस्थित करीत लाखो शेतकऱ्यांना विम्याच्या लाभापासून वंचित ठेवले. परिणामी, शेतकऱ्यांना आतापर्यंत के वळ ७५० कोटींची भरपाई मिळाली होती.  त्यामुळे यंदा कोणत्याही परिस्थितीत शेतकऱ्यांची फसगत होऊ नये यासाठी कृषी विभागाने खबरदारी घेत जुलैमध्ये पावसाअभावी पिके  धोक्यात आली तेव्हा २३ जिल्ह्य़ांत अधिसूचना काढून पिके  संकटात असल्याचे विमा कं पन्यांच्या निदर्शनास आणून दिले.

अतिवृष्टीच्या वेळीही शेतकऱ्यांनी नुकसानीची माहिती विमा कं पन्यांना दिली. यंदा ३८ लाख शेतकऱ्यांचे नुकसान भरपाईचे प्रस्ताव दाखल झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यापैकी २१ लाख शेतकऱ्यांचे १,५५५ कोटींच्या मदतीचे प्रस्ताव मंजूर झाले असून नुकसान भरपाईची रक्कम तातडीने शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याचे आदेश कृषी आयुक्तांनी विमा कं पन्यांना दिले आहेत. त्यानुसार मदतीचे वितरण सुरू झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.

शेतकऱ्यांना वेळेत नुकसान भरपाई मिळावी यासाठी सुरूवातीपासूनच खबरदारी घेण्यात आली. सातत्याने विमा कं पन्यांबरोबर बैठका घेऊन पाठपुरावा केला गेला. आता उर्वरित शेतकऱ्यांनाही विमा रक्कम लवकर मिळावेत यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

–  दादा भुसे, कृषीमंत्री

रकमेची तजवीज अशी.. राज्यात यंदा ८४ लाख शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभाग घेतला आहे. त्यानुसार या शेतकऱ्यांचा ४,५०० कोटींचा विमा उतरविण्यात आला आहे. सहा विमा कं पन्यांकडे शेतकऱ्यांच्या हिश्श्याचे ४४१ कोटी, राज्य सरकारचे ९७३ कोटी आणि  केंद्राचे ८९९ कोटी अशी एकूण २,३१३ कोटी रूपयांची विम्याची रक्कम जमा करण्यात आली आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: 21 lakh farmers in maharastra to get crop insurance compensation before diwali zws

Next Story
नाकर्त्यां लोकप्रतिनिधींमुळे पूरग्रस्त अन्नछत्रात!