‘पर्यटनाची राजधानी’ अशी ओळख असणाऱ्या औरंगाबादच्या विकासासाठी मेगा सर्किट प्रकल्पातून पहिल्या टप्प्यात २३ कोटी ५३ लाख २० हजार रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. बीबी का मकबरा, पानचक्कीसह पर्यटकांसाठी महाराष्ट्र पर्यटन महामंडळातर्फे बसस्थानक, बनी बेगमबाग, रोजबाग, नगारखाना व दौलताबाद येथे या निधीतून विविध विकासकामे हाती घेतली जाणार आहेत. राज्य पर्यटन विकास मंडळामार्फत केंद्र सरकारकडे ५० कोटींचा प्रस्ताव पाठविण्यात आला होता. दीड वर्षांनंतर या प्रकल्पासाठी निधी मंजूर झाला आहे. पुढील वर्षांत उर्वरित निधी मिळेल, असे वरिष्ठ सूत्रांनी सांगितले.
पर्यटनाला चालना मिळावी, म्हणून १० ‘युरो’ बस देण्यात येणार होत्या. तसेच अजिंठा व वेरुळ या मार्गांवर पर्यटकांसाठी वेगळ्या बस ठेवण्याचाही प्रस्ताव होता. पहिल्या टप्प्यात हा भाग मात्र होऊ शकेल की नाही याविषयी शंका आहे. पहिल्या टप्प्यातील निधीतून वेगवेगळ्या प्रकारची कामे हाती घेतली जाणार आहेत. बीबी का मकबरा येथे काही दुरुस्तीची कामे, सार्वजनिक स्वच्छतागृह, संरक्षक भिंत, बाह्य़ विद्युतीकरण करणे, नैसर्गिक देखाव्याची प्रतिकृती बनविणे, वाहनतळ उभारणे, पिण्याच्या पाण्याची सोय, तसेच दिशादर्शक फलक अशी विविध १३ प्रकारची कामे हाती घेतली जाणार आहेत. त्यासाठी ३ कोटी २० लाख रुपयांचा निधी प्रस्तावित करण्यात आला. एवढाच निधी पानचक्कीसाठीही देण्यात आला.
पाणी व्यवस्थापन, दुरुस्तीसाठी हा निधी वापरण्यात येणार आहे, तसेच पानचक्कीच्या भोवताली पार्क उभारण्याची योजनाही तयार आहे. येथेच ‘फूड कोर्ट’ही उभारण्याचे ठरविण्यात आले आहे. खाम नदीची स्वच्छता व सौंदर्यीकरणासाठी काही निधी खर्च होणार आहे. बनी बागेसाठी १ कोटी ५५ लाख ९४ हजार, रोजबागेसाठी ३ कोटी ५५ लाख, अजिंठा व्ह्य़ू पॉइंटसाठी ५९ लाख रुपये दिले जाणार आहेत. शहरातील काही ऐतिहासिक दरवाजांची दुरुस्ती करण्याची गरज ओळखून नगारखाना दरवाजासाठी ८४ लाख २८ हजार रुपये मंजूर करण्यात आले. रोजबागेसाठी ७ कोटींचा प्रस्ताव होता. तेथेही निसर्गदृश्य, फलक, कारंजे यांसह बाह्य़ विद्युतीकरणाची कामे हाती घ्यायची होती. मात्र, मागणीच्या तुलनेत कमी खर्च मंजूर झाला. शहरातील काही रस्तेही विकसित करण्यात येणार असून त्यासाठीही निधीची तरतूद करण्यात आली आहे. दौलताबाद किल्ल्यातही विविध १३ प्रकारची विकासकामे हाती घेतली जाणार असून त्यासाठी २ कोटी १० लाख ८८ हजार रुपये मंजूर करण्यात आले आहेत. मागितलेल्या निधीच्या ५० टक्क्य़ांपेक्षाही कमी निधी पहिल्या टप्प्यात देण्यात आला आहे. मिळालेल्या निधीमुळे औरंगाबादमध्ये पर्यटकांना चांगल्या सोयीसुविधा मिळतील, असे महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास मंडळाचे व्यवस्थापकीय संचालक जगदीश पाटील यांनी सांगितले. ही सर्व विकासकामे याच कार्यालयामार्फत केली जाणार आहेत.