तासगावपासून तीन किलोमीटर अंतरावर चालकाचा ताबा सुटल्याने एस.टी.बस झाडाला धडकून झालेल्या अपघातात ३ जण ठार तर २३ जण जखमी झाले. जखमीमध्ये बस चालक आणि वाहकासह ८ महिलांचा समावेश असून दोघांची प्रकृती चिंताजनक आहे.  कवठेमहांकाळ आगाराच्या तासगावमाग्रे पुणे जाणा-या बसला रविवारी सकाळी हा अपघात झाला.
कवठेमहांकाळ आगाराची बस (एम.एच.४०. व्ही. ९२१९) ही सकाळी ९ वाजता पुण्यासाठी निघाली होती. चिंचणी गावानंतर असणाऱ्या आडवा ओढा या ठिकाणी उजव्या बाजूच्या लिंबाच्या झाडावर जाऊन आदळली. यामुळे दुर्घटना घडली.  या दुर्घटनेत आनंदराव सखाराम भोसले (७५) व त्यांच्या पत्नी फुलाबाई आनंदराव भोसले (६५) दोघे रा. अग्रणधुळगाव ता. कवठेमहांकाळ आणि शिवाजी गेंपाळ खोत रा. लोणारवाडी हे तिघे जण ठार झाले. या अपघातात बस चालक नागनाथ गिरी (३५, रा. रामेश्वर, जि. लातूर) हा गंभीर जखमी झाला असून त्याला सांगलीच्या शासकीय रुग्णालयात अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले आहे.  तसेच अशोक खोत (वाघापूर) हे सुद्धा गंभीर जखमी झाले आहेत.
या अपघातात ८ महिला व १ वर्षांचा एक मुलगा याच्यासह २३ जण जखमी आहेत.  सुहास पाटोळे, लक्ष्मण देशमुख, नीलिमा मंडले, सुशांत मंडले, रूपेश चौधरी (सर्व रा. अंजणी), दिलीप शिंदे (मळणगांव), मालण साळुंखे (बोरगाव), बाळकृष्ण माळवदे, शकुंतला माळवदे, खुदाबक्ष शेख (सर्व रा. सावळज), प्रवण भोसले (धुळगाव), जालिंदर कांबळे, बाईजा कांबळे (शंभर्गी), प्रकाश कदम, सविता खोत, तृप्ती खोत (सर्व रा. वाघापूर), धोंडिराम पवार (लोकरेवाडी), सचिन नलवडे (मतकुणकी), चांगुणा पाटील-लोंढे, वर्षांराणी दशवंत (दहिवडी) अशी जखमींची नावे आहेत.  या अपघातात विवेक अशोक खोत (रा. विठुरायाचीवाडी) हा १ वर्षांचा मुलगा जखमी झाला आहे.  जखमीपकी काहींना खाजगी रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले आहे.
रविवारी सकाळी ९.५० वाजता अपघात घडला.  अपघात घडल्यानंतर तासगावचे पोलिस निरीक्षक रमेश बनकर यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन जखमीना रुगणालयात उपचारासाठी हलविले.  अपघाताबाबत माहिती देताना श्री. बनकर यांनी सांगितले, की ओढय़ा काढी उजव्या बाजूला लिंबाचे झाड असून रस्ता सरळ आहे. चालकाचे बसवर नियंत्रण राहिले नसल्याने हा अपघात घडला असावा. याबाबत चौकशीअंती गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.  अपर पोलिस अधीक्षक डॉ. दिगंबर प्रधान व उपअधीक्षक दिलीप शंकरवार यांनी घटनास्थळी भेट दिली.