पुणे – सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर इंदापूरनजीक गागरगावच्या हद्दीत बुधवारी सकाळी दहाच्या सुमारास झालेल्या कार अपघातात पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयातील प्राध्यापकासह तीन जण ठार, तर एक जखमी झाला आहे.
इंदापूर पोलिसांनी सांगितलेल्या माहितीनुसार, पुण्याहून सोलापूरकडे जात असताना चालकाचे कारवरील नियंत्रण सुटून हा अपघात झाला. भरधाव वेगाने जाणाऱ्या कारच्या पलटय़ा झाल्या. कारमधील महेंद्र परशुराम वाघमारे (वय ४२), आदित्य महेंद्र वाघमारे (वय १६), कौस्तुभ महेंद्र वाघमारे (वय १२) हे तीनजण ठार झाले. तर अनुराधा महेंद्र वाघमारे (वय ३५) या जखमी झाल्या आहेत. मृत व जखमी एकाच कुटुंबातील असून ते पुण्यातील चतु:शृंगी येथील विजय वसंत अपार्टमेंटमधील रहिवासी आहेत. कारचालक महेंद्र वाघमारे हे पत्नी अनुराधा, आदित्य व कौस्तुभ या आपल्या मुलांसह पुण्याहून गावाकडे निघाले होते. मात्र इंदापूरनजीक कारला अपघात होऊन काळाने त्यांच्यावर घाला घातला. पित्यासह दोन्ही मुले या अपघातात बळी पडल्याने इंदापुरात आज नागरिक हळहळ व्यक्त करीत होते. महेंद्र हे फर्ग्युसन महाविद्यालयात गणिताचे प्राध्यापक होते.
या अपघाताचे वृत्त समजताच इंदापूरचे पोलिस घटनास्थळी तातडीने धावले. जखमींना रुग्णालयात दाखल केले. मात्र तिघांचाही मृत्यू झाला होता. जखमी अनुराधा यांनी अपघाताची माहिती दिली असून, इंदापूरचे पोलिस निरीक्षक अशोक पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.
(अपघातग्रस्त गाडीचे संग्रहित छायाचित्र )
संग्रहित लेख, दिनांक 24th Apr 2013 रोजी प्रकाशित
इंदापूरनजीक अपघातात फर्ग्युसनमधील प्राध्यापकासह तीन ठार; एक जखमी
पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर इंदापूरनजीक गागरगावच्या हद्दीत आज सकाळी १०च्या सुमारास झालेल्या कार अपघातात तीन ठार, तर एक जखमी आहे.

First published on: 24-04-2013 at 06:41 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 3 killed 1 injured in car accident near indapur