दलित इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अॅण्ड इंडस्ट्रीज (डिक्की) व अॅस्पायर नॉलेज अॅण्ड स्किल्स इंडिया प्रा. लि. च्या वतीने मोबाईल रिपेअरिंग करणारे मल्टिब्रँड मोबाईल रिपेअरिंग स्टुडिओ सुरु करण्यात येणार आहेत. महाराष्ट्रात याचे प्रायोगिक तत्वावर 300 स्पोक सेंटर्स उभारण्यात येणार असून ते तालुका पातळीवर सुरु करण्यात येणार आहेत. एससी व एसटी प्रवर्गाबरोबरच महिला व इतर प्रवर्गातील नवीन उद्योग सुरु करु इच्छिणाऱ्या स्किल्ड, कौशल्यधारित, अनुभवी व परिश्रम करु इच्छिणाऱ्यांची निवड चाचणीद्वारे यासाठी निवड केली जाणार आहे, अशी माहिती डिक्कीचे संस्थापक अध्यक्ष मिलिंद कांबळे व अॅस्पायर नॉलेज अॅण्ड स्किल्स इंडिया प्रा. लि. अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक संजय गांधी यांनी दिली.

एससी व एसटी प्रवर्गातील होतकरू तरुण-तरुणींना नवउद्योजक बनविण्याच्या दृष्टीकोनातून डिक्की यासाठी मदत करणार असून त्याला केंद्र सरकारच्या स्टँड अप इंडिया मध्ये समाविष्ट करून घेतले जाणार आहे. तसेच, या योजनेस महाराष्ट्र सरकारकडून 15 टक्के सबसिडी मिळणार आहे. डिक्की व अॅस्पायर नॉलेज अॅण्ड स्किल्स इंडिया प्रा. लि. च्या दरम्यान यासंदर्भात मंगळवारी सामंजस्य करार झाला. तालुका पातळीवर लघु उद्योजक तयार करणे आणि गाव पातळीवर रोजगार उपलब्ध करून बेरोजगारीचा प्रश्न सोडविणे हा या प्रकल्पाचा मूळ हेतू आहे.

या प्रकल्पांतर्गत सर्व स्पोक सेंटर ही प्लग अॅण्ड प्ले स्वरुपाची असणार आहेत. सर्व स्पोक सेंटर फ्रॅंचाईजी म्हणून काम करतील. सर्व स्पोक सेंटर एकसारखी असतील आणि टेलिकॉम सेक्टर स्किल कौन्सिलकडून प्रमाणित करण्यात येतील. स्पोक सेंटरमध्ये ग्राहक गॅलरी व मुलभूत मोबाईल रिपेअरिंगच्या सुविधा असतील. सर्व मोबाईल कंपन्यांच्या मोबाईलची याठिकाणी दुरुस्ती होणार आहे.