मालमोटारीने इंडिका कारला दिलेल्या धडकेत तालुक्यातील शिंगणापूर येथील साळुंके कुटुंबातील तिघे आणि कारचा चालक असे चौघे जागीच ठार झाले. मंगळवारी नगर-मनमाड रस्त्यावरील कोकमठाण शिवारात जपे वस्तीसमोर मंगळवारी सकाळी सहाच्या सुमारास हा अपघात झाला. ही धडक इतकी भीषण होती की, इंडिका कारचा चक्काचूर झाला. नगर-मनमाड खराब रस्त्यामुळे आणखी चार बळींची भर पडली आहे.
मृतात इंडिका कारचा चालक गोरख विठ्ठल भोसले (३५) याच्यासह एकाच कुटुंबातील निवृत्ती मारुती साळुंके (६५), राजेंद्र निवृत्ती साळुंके (४०) व आशाबाई राजेंद्र साळुंके (३२, सर्व रा. गोपाळवाडा, शिंगणापूर, ता. कोपरगाव) या चौघांचा समावेश आहे.
साळुंके कुटुंबीय कोपरगाव ते शिर्डी मार्गे पाटोदा तालुक्यातील जातेगाव येथे दशक्रियाविधीसाठी व भावजयीस आणण्यासाठी जात असताना हा अपघात झाला. समोरून चुकीच्या दिशेने येणा-या मालमोटारीने दुस-या वाहनाला ओव्हरटेक करण्याच्या नादात इंडिकाला जोराची धडक दिली. त्यात वरील चौघे जागीच ठार झाले. मृत राजेंद्र साळुंके हे संजीवनी साखर कारखान्याच्या रासायनिक विभागात खलाशी म्हणून नोकरीस होते. त्यांच्या पत्नी आशाबाई यादेखील जागीच ठार झाल्या. या दाम्पत्याला तीन मुली व एक मुलगा व आई असा परिवार आहे. अपघातात साळुंके परिवारावर झडप घातल्याने शिंगणापूर गावावर शोककळा पसरली. गाव बंद ठेवून ग्रामस्थांनी त्यांना श्रध्दांजली वाहण्यात आली.
याप्रकरणी भीमा सोमनाथ संवत्सरकर यांनी पोलिसात फिर्याद दिली असून मालमोटारीच्या चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी मालमोटार ताब्यात घेतली असून चालक रमेश (रा. गुजरात, पूर्ण नाव समजले नाही) हा फरार झाला आहे. माजी मंत्री शंकरराव कोल्हे, संजीवनीचे अध्यक्ष बिपीन कोल्हे, उपाध्यक्ष साईनाथ रोहमारे, महानंदच्या संचालिका स्नेहलता कोल्हे, गोदावरी दूध संघाचे अध्यक्ष राजेश परजणे, सरपंच कैलास संवत्सरकर, यादवराव संवत्सरकर आदींनी  शोक व्यक्त केला.