जालना : पोलिसांनी जालना शहर आणि मंठा तालुक्यात घातलेल्या जुगार अड्ड्यांवरील छाप्यात ४८ जणांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून एकूण ६ लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. घर, हॉटेल इत्यादी ठिकाणी हे जुगार अड्डे सुरू होते.जालना शहरात अंबड रस्त्यावरील एका हॉटेलच्या वरच्या मजल्यावर जुगार अड्डा चालविण्यात येत असल्याची माहिती पोलिसांनी मिळाली होती. या ठिकाणी छापा घालून पोलिसांनी २३ जणांना ताब्यात घेतले. त्यांच्या जवळून ७५ हजार रोख जप्त करण्यात आले. या अड्ड्यावर जुगार खेळताना रोख पैशांऐवजी त्या किमतीच्या ‘टोकन’चा वापर करण्यात येत होता.
जालना शहरातील रहेमानगंज भागातील एका घराच्या वरच्या मजल्यावर छापा घालून पोलिसांनी जुगार खेळणाऱ्या ११ जणांना ताब्यात घेतले. भर वस्तीतील घरामध्ये वरच्या मजल्यावर गोलाकार बसून, तेथे ‘तिर्रट’ जुगार सुरू असल्याचे पोलिसांच्या छाप्यात आढळून आले. याप्रकरणी पोलिसांनी ४४ लाख ३४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. त्यामध्ये चार मोटारसायकली, ११ मोबाइल आणि रोख १७ हजार रुपयांचा समावेश आहे. मंठा तालुक्यातील गेवराई आणि शिरपूर येथेही पोलिसांनी जुगार खेळणारांच्या विरोधात कारवाई केली. गेवराई येथे पोलिसांनी ११ जणांना ताब्यात घेतले, तर शिरपूर येथे पाच जणांना ताब्यात घेतले. दोन्ही ठिकाणच्या छाप्यात पोलिसांनी १ लाख ११ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी पोलिसांनी महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हे नोंदविले आहेत.