वाहतूक व्यवस्था बंद असल्याने ग्रामस्थांची गैरसोय      

कासा : करोनाच्या पाश्र्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या टाळेबंदीमुळे वाहतूक व्यवस्था बंद आहे. त्यामुळे   पावसाळ्यापूर्वीच्या खरेदीसाठी पालघर जिल्ह्य़ातील ग्रामस्थांना सुमारे  ५०  किलोमीटरची पायपीट करावी लागत आहे.

शेतीची कामे सुरू होत असल्याने पुन्हा पुन्हा खरेदीसाठी तालुक्याच्या ठिकाणी यायला नको म्हणून, शेतकरी आणि नागरिक पुढील दोन तीन महिन्यांसाठी किराणा माल, कांदे बटाटे, घरावर टाकण्यासाठी प्लास्टिक कापड, छत्र्या खरेदी करतात.  तसेच शेतकरी वर्ग शेतीची पूर्वतयारी म्हणून बियाणे खते शेतीसाठी लागणारी अवजारे यांची खरेदीही मोठय़ा प्रमाणात करतात. आता पावसाळा तोंडावर आल्याने नागरिक आणि शेतकऱ्यांची खरेदीसाठी लगबग सुरू झाली आहे. पालघर जिल्ह्यतील ग्रामीण भागात ग्रामस्थ साहित्यांची खरेदी करण्यासाठी जव्हार, मोखाडा, तलासरी , विक्रमगड , कासा अशा मुख्य बाजारपेठ असलेल्या ठिकाणी येतात. परंतु या वर्षी करोनामुळे टाळेबंदी लागू केलेली आहे. त्यामुळे बस , जिप, ऑटो रिक्षा असे ग्रामीण भागातील महत्त्वाची दळणवळणाची साधने बंद आहेत.

त्यामुळे ग्रामीण भागातील शेतकरी नागरिकांना बाजारपेठेच्या ठिकाणी येण्यासाठी २० ते २५ किमीपर्यंतची पायपीट  करावी लागत आहे. तसेच किराणा, खते अशी खरेदी केलेला माल डोक्यावर घेऊन पुन्हा तेवढीच पायपीट करत पुन्हा आपल्या घरी जावे लागत आहे. यामुळे नागरिक आणि शेतकऱ्यांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. तरी प्रशासनाने शेतकऱ्यांची आणि नागरिकांची ही अडचण लक्षात घेऊन करोना नियमांचे पालन होईल अशा पद्धतीने नियोजन करून वाहतुकीला परवानगी द्यावी अशी मागणी ग्रामीण भागातील नागरिक आणि शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.

गेल्या एक वर्षांपासून करोना चालू असल्यामुळे एक तर पैसे नाहीत , परंतु शेती करायची असल्याने बियाणे- खते घेण्याची गरज आहे. त्यासाठी आम्हाला १२  किमीवर असलेल्या जव्हार तालुक्यातून  वढ गावात पायी चालत जावे लागत आहे. शासनाने आमची अडचण समजून वाहतुकीची परवानगी द्यावी.

-मधुकर भोये, शेतकरी