माथेरानच्या पर्यटन विकासासाठी राज्य शासन कटिबद्ध असून शहरातील पायाभूत सुविधांसाठी साडेसहा कोटींचा निधी देत असल्याचे राज्याचे पर्यटनमंत्री छगन भुजबळ यांनी जाहीर केले. ते माथेरान येथील प्रस्तावित रोप वेच्या स्थळाची पाहणी केल्यानंतर पत्रकारांशी बोलत होते.
तब्बल बारा वर्षांच्या प्रतीक्षेनंतर माथेरान इथे रोप वे उभारणीसाठी राज्य सरकारने मंजुरी दिली आहे. याबाबतची अधिसूचना नुकतीच जारी करण्यात आली आहे. अधिसूचना जारी झाल्यानंतर राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ यांनी या ठिकाणांची पाहणी केली आहे.
 या वेळी स्थानिक आमदार सुरेश लाड, रोप वेचे प्रवर्तक विजयचंद कोठारी, नगराध्यक्ष  अजय सावंत यांच्यासह अधिकारी आणि नगरसेवक उपस्थित होते. माथेरानचा हा प्रस्तावित रोप वे प्रकल्प कर्जत-नेरळ मार्गावरील भुतवली येथून सुरू होणार आहे. एकूण ४.९ किलोमीटरचे हे अंतर दोन टप्प्यात विभागले जाणार आहे.
या रोप वेसाठी दोन वेगवेगळ्या तंत्रज्ञानांचा वापर केला जाणार आहे. रोप वेचा पहिला टप्पा भुतवली ते गार्बट पॉइंट तर दुसरा टप्पा गार्बट पॉइंट ते माधवजी पॉइंट असा असणार आहे. यामुळे माथेरानच्या पर्यटनाला चालना मिळेल, अशी अपेक्षा भुजबळ यांनी व्यक्त केली. माथेरानमध्ये पायाभूत सुविधांच्या विकासासाठी तब्बल साडेसहा कोटींचा निधी देत असल्याचे त्यांनी या वेळी जाहीर केले.  दस्तुरी नाका येथील वाहनतळाच्या विकासासाठी दीड कोटी, रस्ते विकासासाठी साडेतीन कोटी, पॅनोरमा पॉइंट विकासासाठी ५० लाख, मायरा पॉइंटच्या विकासासाठी ५० लाख, शौचालयांच्या बांधकामासाठी ३२ लाख यांसारख्या कामांचा समावेश असल्याचे त्यांनी सांगितले. ३१ मार्चपूर्वी नगर परिषदेला यातील पावणेदोन कोटींचा निधी खर्च करणे बंधनकारक असल्याचे त्यांनी या वेळी सांगितले.   याशिवाय माथेरानच्या सांडपाणी व्यवस्थापनासाठी पावणेपाच कोटींची योजना तयार करण्यात आली आहे. यातील अर्धी रक्कम पर्यटन विभागाकडून दिली जाणार असल्याचे त्यांनी या वेळी जाहीर केले. माथेरानच्या पर्यटन विकासासाठी राज्य सरकार कटिबद्ध असल्याचे त्यांनी या वेळी सांगितले.