मंत्रालयाबाहेर एका वृद्ध महिलेने आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना शुक्रवारी दुपारी घडली. या महिलेला सेंट जॉर्ज रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. महिलेने कफ सिरप प्राशन केल्याचे समोर आले असून जमिनीच्या वादात न्याय मिळावा, यासाठी महिला मुंबईत आली होती. घटनेच्या वेळी महिलेसह तिचा मुलगा देखील तिथेच उपस्थित होता. या प्रकरणी पोलीस अधिक चौकशी करत आहे.
नाशिकमधील चांदवड भागात राहणाऱ्या शकूबाई झालपे (वय ६२) आणि त्यांचा मुलगा शुक्रवारी दुपारी मंत्रालयाबाहेर आले. दिराने जमीन हडपली असून या प्रकरणात न्याय मिळावा, अशी त्यांची मागणी होती. सदर महिला दुपारी मंत्रालयाबाहेर विधानभवनासमोरील रस्त्यावर आली. तिने काचेची बाटली तोंडाला लावली, यावेळी तिच्या एकंदर देहबोलीवरुन इतरांना संशय आला. रस्त्यात ती कोसळल्याने तिने आत्महत्या करण्यासाठी विष प्राशन केल्याचा संशय व्यक्त करण्यात आला. मात्र, तपासाअंती तिने कफ सिरप प्यायलाचे उघड झाले. सध्या तिची प्रकृती स्थिर आहे. त्यामुळे हा खरंच आत्महत्येचा प्रयत्न होता की बनाव होता की लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न होता, अशी चर्चा दबक्या आवाजात सुरु होती.
धर्मा पाटील या वृद्ध शेतकऱ्याने तसेच हर्षल सुरेश रावते या तरुणाने मंत्रालयात आत्महत्या केल्याची घटना गेल्या महिनाभरात घडली आहे. तर मंत्रालयात आत्महत्येचा प्रयत्न करण्याचे प्रमाणही वाढत होते. शेवटी मंत्रालयाच्या वरच्या मजल्यांवरून उडी मारून आत्महत्या किंवा आत्महत्येचे प्रयत्न रोखण्यासाठी सरकारने प्रतिबंधात्मक उपाय म्हणून मंत्रालयात नायलॉनची जाळी लावली आहे. मुख्य इमारतीच्या प्रत्येक मजल्यावर चहूबाजूंनी पहारा देण्यासाठी पोलिसांच्या तुकडय़ा बनविण्यात आल्या आहेत.