राज्यभरात रविवारी होळीचा सण उत्साहात साजरा होत असतानाच पुणे-बेंगळुरू महामार्गावर झालेल्या तीन अपघातांत सात जण ठार तर नऊ जण जखमी झाले. सांगली, कराड व वाई या तीन ठिकाणी हे अपघात घडले. मृतांमध्ये दाम्पत्याचा समावेश आहे.
पौर्णिमेच्या निमित्ताने जोतिबाच्या दर्शनासाठी निघालेल्या जोतिबाभक्तांच्या टाटा सुमो जीपचा टायर फुटून झालेल्या भीषण अपघातात तीन जण ठार, तर नऊ जण जखमी झाल्याची घटना पुणे-बंगळूरू महामार्गावरील वाळवा तालुक्यातील येडेनिपाणी फाटय़ाजवळ रविवारी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास घडली. मृत व जखमी पाटण तालुक्यातील ढेबेवाडी विभागातील आहेत. अपघाताची नोंद कुरळूप पोलीस दूरक्षेत्रात झाली आहे.
अन्य एका घटनेत कराड-ढेबेवाडी मार्गावरील विंग फाटा (ता. कराड) येथे कराडकडे येणाऱ्या खासगी लक्झरी बसने चुकीच्या मार्गाने येत मोटारसायकलवरील पती-पत्नीस धडक दिल्याने दोघांचा जागीच मृत्यू झाला. त्यामुळे संतप्त तरुणांनी लक्झरीची तोडफोड करीत पेटते बोळे टाकून ती पेटवून दिल्याची घटना सकाळी साडेनऊच्या सुमारास घडली.
महामार्गावर खंबाटकी बोगद्यातून बाहेर येऊन पुण्याकडे येत असताना मोटार गाडी रस्ता सोडून डोंगरकडय़ावर आदळून झालेल्या अपघातात दोन ठार आणि तीन जखमी झाले. रविवारी मध्यरात्रीनंतर दोनच्या सुमारास गाडीतून पुण्याकडे जात असताना हा अपघात झाला. बसवराज व्यंक्कन्ना मुळगुंद (वय २१)रा.मुजूर ता. मुधोळ जि. बागलकोट,याचा जागीच मृत्यू झाला,तर वीरप्पा चदाप्पा शहापुरे याचा दवाखान्यात उपचार सुरू असताना मृत्यू झाला. तर, किरण विराप्पा मुपागे, दयानंद श्रीकांत गब्बूर, पृथ्वी पन्नाप्पा चव्हाण हे जखमी झाले. खंडाळा पोलीस अधिक तपास करत आहेत.
(छायाचित्र: संग्रही)