सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्ह्य़ात ८०४ कुटुंबांना सुरक्षिततेसाठी स्थलांतरित केले आहे. दरम्यान आंबोली घाट रस्ता खचल्यामुळे आंतरराज्य वाहतुकीवर परिणाम होणार आहे . शिरिशगे येथे डोंगर व रस्त्यांला तडे गेले आहेत येथील गोठवेवाडीतील ४०० लोकांना स्थलांतरित करण्यात आले आहे तसेच सह्य़ाद्री पट्टय़ातील असनिये गावात डोंगर खचला आहे. त्यामुळे दोन गावांचा रस्ता व ५०० लोंकाचा संपर्क तुटला आहे.  दाभीळ गावचा रस्ता वाहून गेल्याने ३५० लोकांचा शहराशी संपर्क तुटला आहे.

कोसळणाऱ्या पावसाने गुरुवारी सिंधुदुर्गात काही प्रमाणात उसंत घेतली असली तरी अर्धा जिल्हा अद्याप पुराच्या वेढय़ात अडकला आहे.

यामध्ये कुडाळ, सावंतवाडी, दोडामार्ग व वेंगुल्रे या तालुक्यांचा समावेश असून येथील तब्बल ८०४ कुटुंबांना पूर नियंत्रक पथक नागरिकांच्या मदतीने सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे. मात्र, तरीही जिल्ह्य़ातील पूर परिस्थिती नियंत्रणात असल्याचे जिल्हा प्रशासनाचे म्हणणे आहे.

जिल्ह्य़ात ४ ऑगस्ट रोजी मुसळधार पाऊस सुरू झाला. या पावसाने जिल्ह्य़ात हाहाकार माजविला होता. खारेपाटण, बांदा, कुडाळ, काळसे, तिलारी आदी भागात पुराच्या पाण्याने कहर केल्याने तेथील नागरिकांची व प्रशासनाची पळापळ झाली.

जिल्हा आपत्ती निवारण विभागातून पूरस्थितीचा आढावा घेतला असता जिल्हय़ातील विशेषत दोडामार्ग, सावंतवाडी, कुडाळ व वेंगुर्ला तालुक्यातील ८०४ कुटुंबाना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे. दोडामार्ग तालुक्यातील घोटगेवाडी, चांभारवाडी, घोटगेवाडी(भटवाडी), घोटगे येळपईवाडी, मणेरी, मणेरी बडमेवाडी, तळेवाडी, कुडासे वानोशीवाडी, साटेली, कोनाळ ठाकरवाडी, तिराळीवाडी, कोनाळकट्टा, घोटगे वायंगणतड, झोळबे दाबटेवाडी येथील ४४९ कुटुंबांचे गुरुवारी स्थलांतर करण्यात आले. सावंतवाडी तालुक्यातील शिरिशगे गोठवेवाडी येथील १०० कुटुंबाना जमिनीला भेगा पडल्याने त्यांच्या नातेवाईकांकडे स्थलांतरित केलेले आहे.

वेंगुर्ला तालुक्यातील सागरेश्वर, सिद्धार्थवाडी, चिपीवाडी, होडावडा बाजारपेठ, होडावडा, कवडासवाडी येथील ३८ कुटुंबाना संरक्षित ठिकाणी नेण्यात आले आहे. कुडाळ तालुक्यातील आंबेडकर नगर, गुलमोहर हॉटेल, लक्ष्मीवाडी, कवीलकाटे, चेंदवण मळेवाडी, सरंबळ नाईकवाडी, पावशी शेलटेवाडी, बाव बागवाडी, पिंगुळी गुढीपूर येथील २१७ कुटुंबांना स्थलांतरित करण्यात आले आहे

कुडाळ तालुक्यातील सरंबळ येथे रस्त्याला भेगा पडल्या असून डोंगरावरील माती खाली येत आहे. चेंदवण व सरंबळ येथे नदीला पूर आला आहे. चेंदवण येथील २५ व्यक्तींना स्थलांतरित केले असून सरंबळ गावातील ४८ व्यक्तींना बोटीतून बाहेर काढून त्यांच्या त्यांच्या नातेवाईकांकडे पोहचवण्यात आले आहे. वेंगुर्ला येथे सागरेश्वर मंदिर नजीक ओढय़ाचे पाणी आल्याने एकाच कुटुंबातील ८ ते ९ व्यक्तींना तात्पुरते स्थलांतरित करण्यात आले आहे. खारेपाटण बाजारपेठ जैनवाडी येथील पाण्यात अडकलेल्या ५ व्यक्तींना सुरक्षित स्थळी हलविलेले आहे. वैभववाडा तालुक्यात दिगशी येथे नदीला पूर आल्याने संतोष सावंत यांच्या घराभोवती पाणी भरल्याने तीन व्यक्ती आडकल्या होत्या. त्यांना सुरक्षित स्थळी हवलिण्यात आले आहे. तर मालवण येथे मळा येथे भरतीमुळे ५ कुटुंबातील २० व्यक्तींना तसेच २५ गुरांना सुरक्षित स्थळी हलविले आहे. बागवाडी येथील २ कुटुबांतील ६ व्यक्ती आणि ८ गुरे तर देवली येथील ४ कुटुंबातील १२ व्यक्तींना तसेच १८ गुरांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आल्याची माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाने दिली आहे.

तिलारी धरणातून पाण्याचा मोठा विसर्ग सुरू 

तिलारी अंतरराज्य प्रकल्प ९६.१९ टक्के भरला असल्यामुळे या धरणातून सध्या १२८९ घ.मी. प्रतिसेकंद अर्थात सुमारे ३६ हजार क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे, या धरणाच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या चोवीस तासांत २८२.२० मि.मी. पावासचा नोंद झाली आहे. तर आतापर्यंत एकूण ४१३१.४०मि.मी. पाऊस झाला आहे. या धरणातून पाणी सोडल्यामुळे नदी काठच्या गावातील ग्रामस्थांना स्थलांतरित करण्यात आले आहे. तर मणेरी पूल पाण्याखाली गेल्यामुळे हा मार्ग बंद झाला आहे. तिराली नगरीतील ग्रामस्थांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे. २१ जणांचे एन.डी.आर.एफ.चे पथक या ठिकाणी तनात करण्यात आले आहे. तसेच पुरात अडकलेल्या लोकांची सुटका करण्यासाठी ८ बोटी तनात केल्या आहेत.

देवघर मध्यम प्रकल्प ८४.८० टक्के भरला असून या धरणातून सध्या ५८.५९ घ.मी. प्रतिसेकंद इतका विसर्ग सुरू आहे.

जिल्ह्य़ात पावसाचा जोर कायम असून सावंतवाडी तालुक्यात सर्वाधिक १८० मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. गेल्या चोवीस तासांत जिल्ह्य़ात सरासरी १०८.२५ मि.मी. पाऊस झाला आहे. तालुकानिहाय पावसाची आकडेवारी पुढील प्रमाणे आहे. सर्व आकडे मिलिमीटर परिमाणात आहेत. कणकवली १०३, कुडाळ १३१, वैभववाडी ८०, देवगड २५, दोडामार्ग १०४, सा. वाडी १८०, मालवण ७२, वेंगुर्ला १७१ पाऊस झाला आहे.