व्याघ्रगणनेच्या चौथ्या टप्प्यात १६ वाघ वाढले
ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील कोअर व बफरच्या १७०० चौ.कि.मी. जंगलात ८८ पट्टेदार वाघांची नोंद घेण्यात आली आहे. व्याघ्रगणनेच्या चौथ्या टप्प्याचा ताजा अहवाल वाइल्ड लाइफ इन्स्टिटय़ूट ऑफ डेहराडूनचे डॉ. हबीब बिलाल यांनी बुधवारी वन्यजीव विभागाचे प्रधान मुख्य वनसंरक्षक श्री. भगवान यांच्याकडे सुपूर्द केला. त्यानुसार ताडोबात या वर्षी वाघांची संख्या १६ने वाढली आहे.
ताडोबा व्याघ्र प्रकल्पाच्या कोअर व बफर क्षेत्रात व्याघ्रगणनेच्या चौथ्या टप्प्याचे काम पूर्ण झाल्यानंतर ही व्याघ्र संवर्धनाची सुखावणारी आकडेवारी समोर आली आहे. गेल्या वर्षी जानेवारी-मे २०१५ मध्ये टप्पा ४ चे ‘मॉनिटरिंग वाइल्ड लाईफ इन्स्टिटय़ूट ऑफ डेहराडून’चे प्रमुख अभ्यासक डॉ. हबीब बिलाल व सहकाऱ्यांच्या मदतीने करण्यात आले होते. यासाठी ताडोबाच्या कोअर व बफरच्या १७०० चौ.कि.मी. जंगलात ३८१ कॅमेरा ट्रॅप सलग २४ तास १२० दिवस ठेवण्यात आले होते. यातून ९ हजार १४४ छायाचित्रे घेण्यात आली. यात ताडोबा कोअर क्षेत्रातील ६२५ चौ.कि.मी.मध्ये ५१ पूर्ण वाढ झालेल्या वाघांची, तर बफर क्षेत्रात १४ वाघांची छायाचित्रे आहेत, तसेच या दोन्ही क्षेत्रांत ये-जा करणारे ६ वाघ आहेत. या सर्व छायाचित्रांच्या अभ्यासानंतर ताडोबात ८८ वाघ असल्याची नोंद घेण्यात आली आहे.
बिबटेही वाढले
गेल्या पाच वर्षांत विविध पद्धतीने वाघांच्या संख्येची नोंद घेतली असता २०१२ मध्ये ४९, २०१४ मध्ये ५१ व २०१४ मध्ये ७२ अशी संख्या होती, तर बिबटय़ांची संख्या ३७ वरून थेट ४९ वर गेली आहे. ताडोबात प्रत्येक १०० चौ.कि.मी.ला वाघाची घनता ५.६७ आहे. यासाठी कोअर क्षेत्रात ५७ लाइन ट्रान्झ्ॉट, तर बफर क्षेत्रात ३८ नमुने पाच वेळा घेण्यात आले आहेत. वाघांच्या वाढलेल्या संख्येवरून ताडोबा खऱ्या अर्थाने वाघांसाठी सुरक्षित आहे. विशेष म्हणजे, ताडोबातील वाघांचा जन्मदर कायम हलता असल्याचे गेल्या पाच वर्षांतील आकडेवारीवरून दिसून येते.
संग्रहित लेख, दिनांक 10th Jan 2016 रोजी प्रकाशित
ताडोबाच्या जंगलात ८८ पट्टेदार वाघ
व्याघ्र प्रकल्पातील कोअर व बफरच्या १७०० चौ.कि.मी. जंगलात ८८ पट्टेदार वाघांची नोंद घेण्यात आली आहे.
Written by लोकसत्ता टीम

First published on: 10-01-2016 at 01:37 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 88 tiger in tadoba forest