मुंबई : जायकवाडी धरण ९० टक्के भरल्याने मराठवाडय़ातील अनेक तहानलेल्या गावांसाठी गोदावरी खोऱ्यात पाणी सोडण्याचा निर्णय जलसंपदा विभागाने घेतला आहे. अनेक भागांमध्ये अतिवृष्टी व पुराने कहर केला असतानाही काही भागांत पाऊस नसल्याने  टँकर्स सुरू आहेत, अशी माहिती  अधिकाऱ्यांनी दिली.

नाशिक परिसरात अतिवृष्टी झाल्याने गेल्या काही दिवसांपासून तेथील धरणांमधून मोठय़ा प्रमाणावर पाण्याचा विसर्ग करण्यात आल्याने जायकवाडी धरण  ९० टक्के भरले आहे. मराठवाडय़ात फारसा पाऊस नसताना जायकवाडीत एवढा मोठा पाणीसाठा झाल्याचा फायदा तेथील जनतेला होणार आहे. जायकवाडी धरणातून गोदावरी खोऱ्यात पाणी सोडल्यास त्याचा फायदा शेकडो गावांना होईल. त्यामुळे हे पाणी सोडण्याची विनंती जलसंधारण मंत्री बबनराव लोणीकर व काही आमदारांनी केली. तेव्हा किमान एक टीएमसी पाणी सोडण्याच्या सूचना अभियंत्यांना देण्यात आल्याचे महाजन यांनी सांगितले.