नाशिकमध्ये ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या तयारीला वेग आला आहे. लोकहितवादी मंडळ, नाशिक आयोजित अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे ९४ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन ‘कुसुमाग्रज नगरी’, भुजबळ नॉलेज सिटी, आडगाव नाशिक येथे दि. ३, ४ व ५ डिसेंबर रोजी होणार आहे. मात्र एकीकडे या संमलेनाची तयारी सुरु असतानाच दुसरीकडे या संमलेनामध्ये प्रसिद्धी कवी आणि गितकार जावेद अख्तर तसेच गुलजार यांना सहभागी करुन घेण्यास ब्राह्मण महासंघाने विरोध दर्शवला आहे.

ब्राह्मण महासंघाचे संस्थापक अध्यक्ष आनंद दवे यांनी महासंघाची भूमिका स्पष्ट करताना, जावेद अख्तर आणि गुलजार यांचे मराठी नाट्य सृष्टीत काय योगदान आहे? वीर सावरकरांच्या भूमीत अख्तर, गुलजार कशासाठी?, असे प्रश्न उपस्थित केले आहेत. या संमेलनामध्ये गुलजार आणि अख्तर यांच्या नावांचा समावेश करण्याला आमचा विरोध राहील असं दवे यांनी स्पष्ट केलं आहे.

आगामी मराठी साहित्य संमेलनच्या उदघाटनसाठी या दोघांच्या नावाचा विचार होत आहे आणि तशी त्यांना विनंती पण करण्यात येत असल्याचे समजलं असून आम्ही यास तीव्र विरोध करीत आहोत, असं ब्राह्मण महासंघाने स्पष्ट केलं आहे. साहित्य सृष्टीत योगदान देणारे अनेक दिग्गज आज महाराष्टात उपलब्ध असताना नेहमीच हिंदू धर्माच्या विरोधात बोलणाऱ्या, लिहिणाऱ्यांना बोलावून साहित्य संमेलनचे पदाधिकारी नेमका कोणता संदेश देऊ पाहत आहेत?, असा प्रश्न ब्राह्मण महासंघाने उपस्थित केलाय.

फादर दिब्रिटो यांना असाच एकदा सन्मान दिला गेला होता, आम्ही त्यावेळेस पण विरोध केला होता. आदल्या दिवसापर्यंत ठीक ठाक असणारे दिब्रिटो पुस्तकं पालखीच्या वेळेस आजारी पडले होते आणि नंतर पुन्हा मोठं भाषण करायला मोकळे होते, अशी टीका ब्राह्मण महासंघाच्या दवे यांनी केलीय.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दिब्रिटो असो की गुलजार किंवा जावेद यांना ना हिंदू धर्माचं प्रेम ना त्याविषयी आदर. त्यामुळे या अशा या आत्मप्रेमी लोकांना अशा महत्वाच्या पदांचा सन्मान देऊ नये, अशी ब्राह्मण महासंघाची भूमिका असल्याचं दवे यांनी म्हटलं आहे. जयंत नारळीकरांसारखा अध्यक्ष असताना वीर सावरकर यांच्या भूमीत या विकृतांच्या हस्ते हे उदघाटन होण्यास आमचा विरोध राहील, असं दवे यांनी स्पष्ट केलं आहे.