राहाता : सध्याची भारत – पाकिस्तान दरम्यान निर्माण झालेली युद्धजन्य परिस्थिती व काही दिवसांपूर्वी आलेला धमकीचा संदेश या पार्श्वभूमीवर रविवारपासून (११ मे) सुरक्षेच्या दृष्टीने श्री साईबाबा समाधी मंदिरात हार, फुले, गुच्छ, प्रसाद, शाल नेण्यास मनाई करण्याचा ठराव साईबाबा संस्थानाच्या तदर्थ समितीच्या बैठकीत घेण्यात आला आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडिलकर यांनी ही माहिती दिली.

आज, शनिवारी संस्थानची सुरक्षा आढावा बैठक घेण्यात आली. या वेळी संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गाडिलकर, पोलीस अधीक्षक राकेश ओला, अतिरिक्त पोलीस अधीक्षक वैभव कलबुर्मे, शिर्डीचे उपविभागीय अधिकारी शिरीष वमणे, पोलीस निरीक्षक रणजित गलांडे, मंदिर सुरक्षेचे पोलीस निरीक्षक सतीश घोटेकर आदी उपस्थित होते.

बैठकीनंतर अधिकाऱ्यांनी साई मंदिराला भेट देत पाहणी केली व सुरक्षेबाबत विविध सूचना केल्या. साई मंदिरात साई दर्शनासाठी येणाऱ्या साई भक्तांची बारकाईने तपासणी करण्यात येणार आहे. त्याबरोबरच बॉम्बशोधक पथकाद्वारे नियमितपणे साई मंदिराची तपासणी केली जाणार आहे. साई मंदिरासाठी साईबाबा संस्थानचे एक हजार सुरक्षारक्षक असून, त्यांच्या दिमतीला शीघ्र कृतिदलाचे जवान व क्यूआरटी पथक तैनात आहे. सुरक्षेबाबत कठोर उपाययोजना करून त्याची अंमलबजावणी करण्याची सूचना देण्यात आली.

गाडिलकर यांनी सांगितले, की साईबाबा मंदिर सुरक्षेबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पाहणी केली. भारत-पाकिस्तानमधील तणाव व साईमंदिर बॉम्बने उडवून देण्याचा आलेला धमकीचा मेल बघता कठोर उपाययोजना राबविण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्याबरोबरच साईबाबा संस्थानच्या त्रिस्तरीय समितीने रविवारपासून साई मंदिरात हार, फुले, प्रसाद व शाल नेण्यास बंदी घालण्यात आली आहे. सुरक्षेसाठी साईभक्तांनी संस्थान प्रशासनाला सहकार्य करावे.

गर्दी रोडावली

सध्याच्या परिस्थितीत शिर्डीतील साई भक्तांची गर्दी रोडावली आहे. त्यामुळे शिर्डीतील व्यावसायिकांची आर्थिक बाजू कोलमडण्यास सुरुवात झाल्याचे दिसून येत आहे.

‘इलेक्ट्रॉनिक गॅझेट’ला बंदी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सद्य:स्थितीत मंदिर व परिसरातील सुरक्षा सतर्क करण्यात आली आहे. साई मंदिर व शिर्डी आंतरराष्ट्रीय विमानतळावर विशेष बाब म्हणून दररोज घातपातविरोधी पथकाकडून तपासणी करण्यात येत आहे. तसेच या ठिकाणी बॉम्बशोधक पथकाद्वारे तपासणी करण्यात येत आहे. मंदिर व परिसरात मोबाइल व इतर इलेक्ट्रॉनिक्स गॅझेट नेण्यास बंदी घालण्यात आली आहे. साईभक्तांनी अफवेवर विश्वास न ठेवता निःसंकोचपणे दर्शनाला यावे. भक्तांच्या सुरक्षेसाठी यंत्रणा सज्ज आहे.- सतीश घोटेकर, पोलीस निरीक्षक, साईबाबा मंदिर सुरक्षा