अहिल्यानगर: श्रावण महिन्यानिमित्त शनिशिंगणापूरच्या शनि देवस्थानने भाविकांसाठी आजपासून दर शनिवारी विशेष सेवा सुरू केली आहे. त्यानुसार श्रावण महिन्यातील शनिवारी पहाटे ५ ते ७ या वेळात ओल्या वस्त्रांनी चौथाऱ्यावर जाऊन जल अर्पण करण्याची मुभा देण्यात आली आहे. ही सेवा आजपासून २३ ऑगस्टपर्यंत फक्त श्रावण महिन्यासाठीच सुरू करण्यात आली आहे. त्यानुसार आज, श्रावणातील पहिल्याच शनिवारी भाविकांची शनिशिंगणापूर येथे शनिदेव दर्शनासाठी अलोट गर्दी उसळली होती.
शुक्रवारी रात्रीपासून सुरू असलेल्या पावसाच्या रिमझिम सरी झेलत देशभरातील भाविक शनिदेवाच्या चरणी नतमस्तक झाले. पहाटेपासूनच मंदिर परिसर भक्तांच्या जयघोषाने दुमदुमून गेला होता. देवस्थान व प्रशासनाच्या संयुक्त नियोजनामुळे दर्शन व्यवस्था शांततेत पार पडली. भाविकांसाठी सीसीटीव्ही, वैद्यकीय सुविधा, पिण्याचे पाणी, नियंत्रण कक्ष आदी सुविधा उपलब्ध करण्यात आल्या होत्या. मात्र ‘लटकूं’च्या त्रासाबद्दल भाविकांकडून संताप व्यक्त केला जात होता.
आपल्याच दुकानातून पूजेचे साहित्य अवाच्यासव्वा दरात भाविकाने खरेदी करावे यासाठी काही दुकानदारांनी नियुक्त केलेले युवक वाहनांना लटकतात व आपल्याच दुकानाकडे वाहन वळवण्यास भाग पाडतात, त्यासाठी पैशांची मागणी केली जात असल्याच्या तक्रारी भाविकांनी केल्या. संतप्त भाविकांनी प्रशासनाकडे तक्रारी केल्यानंतर पोलिसांनी देवस्थानच्या परिसरात बंदोबस्त वाढवून परिस्थिती नियंत्रणात आणली.
नवस फेडण्यासाठी भाविक शनिदेवाला तैलाभिषेक करतात तर अनेकजण पायीयात्रा करत दर्शन घेतात. पुढील शनिवारी अधिक गर्दी होण्याची शक्यता असल्याने भाविकांनी शिस्त, संयम पाळून दर्शन घ्यावे, असे आवाहन देवस्थान व प्रशासनाने केले आहे.