सशस्त्र दरोडय़ाचा नातवाचा बनाव उघडकीस

सोलापूर : कर्जबाजारी नातवानेच आपल्या वृद्ध आजोबाचा खून करून २५तोळे सोने लंपास केले आणि नंतर सशस्त्र दरोडय़ाचा बनाव केल्याचे उजेडात आले आहे. माळशिरस तालुक्यातील नातेपुते येथे हा प्रकार घडला. सोन्याच्या हव्यासापोटी आजोबाचा खून करणाऱ्या नातवासह त्यांच्या दोन मित्रांना पोलिसांनी अटक केली आहे.

नातेपुते येथे शिंदे वस्तीवर चार सशस्त्र दरोडेखोरांनी घुसून भगवानराव जगदेवराव शिंदे यांचे हातपाय बांधून बेदम मारहाण केली. यात त्यांचा मृत्यू झाला. नंतर दरोडेखोरांनी आजोबाच्या खोलीतील कपाट फोडून २५ तोळे सोन्याचे दागिने लुटून नेल्याची फिर्याद प्रसाद दिलीप शिंदे (वय २५) याने नातेपुते पोलीस ठाण्यात नोंदविली होती. फिर्यादी प्रसाद हा किरकोळ व्यापार करतो. शिंदे वस्तीवर शिंदे कुटुंबीयांच्या आठ खोल्या आहेत. एका खोलीत प्रसादचे आजोबा भगवानराव रात्री झोपतात. त्यांच्याच खोलीत प्रसाद हा देखील झोपला होता. मध्यरात्रीनंतर प्रसाद हा झोपेतून जागा होऊन लघुशंकेसाठी खोलीबाहेर पडला. तेव्हा खोलीसमोर चार दरोडेखोर उभे होते. त्यांनी शस्त्रांचा धाक दाखवत प्रसाद यास खोलीत बंद केले. नंतर आजोबा भगवानराव यांना बांधून बेदम मारहाण करीत त्यांच्याकडे खोलीतील कपाटाच्या चाव्या मागितल्या. तेव्हा आजोबांनी नकार दिल्याने दरोडेखोरांनी त्यांना बेदम मारहाण केली. यात त्यांचा मृत्यू झाला. नंतर दरोडेखोरांनी खोलीतील पाच लाख रुपये किमतीचे २५ तोळे सोन्याचे दागिने लुटून नेले, अशी माहिती प्रसाद याने फिर्यादीत नमूद केली होती.

पोलीसांनी प्रसाद यास विश्वासात घेऊन प्रश्नांची सरबत्ती केली तेव्हा त्याचा बनाव उजेडात आला. त्याने आपले मित्र सागर छबुराव रणनवरे (वय २९, रा. शिंदेनगर, ता. फलटण) व दत्तात्रेय सीताराम देशमुख (वय ३५, रा. शिंदेवाडी, नातेपुते) यांच्या मदतीने आजोबा भगवानराव यांचा खून करून सोने लुटल्याचे समोर आले.