scorecardresearch

सोलापूर : लव्ह जिहादचा संशय घेऊन अल्पसंख्याक समाजातील तरुणावर झुंडीने हल्ला

तरुणावर ‘लव्ह जिहाद’चा संशय घेऊन झुंडीने आलेल्या टोळक्याने बेदम मारहाण केली. या हल्ल्यात तरुण सुदैवाने बचावला तरी त्याच्या छातीतील बरगड्यांना गंभीर दुखापत झाली आहे.

mob attack minority youth solapur
लव्ह जिहादचा संशय घेऊन अल्पसंख्याक समाजातील तरुणावर झुंडीने हल्ला (प्रातिनिधिक छायाचित्र)

सोलापूर : अल्पसंख्याक समाजाच्या एका तरुणावर ‘लव्ह जिहाद’चा संशय घेऊन झुंडीने आलेल्या टोळक्याने बेदम मारहाण केली. या हल्ल्यात तरुण सुदैवाने बचावला तरी त्याच्या छातीतील बरगड्यांना गंभीर दुखापत झाली आहे. यासंदर्भात सदर बझार पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाली असून, पोलीस पुढील तपास करीत आहेत.

३० वर्षीय जखमी तरुण आणि बहुसंख्याक समाजातील तरुणी एकाच खासगी कार्यालयात नोकरी करतात. अनेक वर्षांपासून त्यांच्यात कौटुंबिक जिव्हाळ्याचे नाते आहे. तरुण विवाहित आहे. तर तरुणी अविवाहित आणि नोकरी करीत शिक्षणही घेत आहे. शैक्षणिक कामाच्या निमित्ताने पीडित तरुणीने तरुणाला एम्लॉयमेंट चौकात बोलावून घेतले. तेथे कामाशी संबंधित चर्चा करताना ते जवळच्या आइस्क्रिम पार्लर दुकानात जाऊन आइस्क्रिम खाऊ लागले. तेव्हा काही वेळातच तरुणांची झुंड तेथे आली.

हेही वाचा – प्रेयसीला अपशब्द वापरल्याने मुलाने केला वडिलांचा खून

जय श्रीरामचे नारे देत झुंडीतील तरुणांनी जखमी तरुणाला लव्ह जिहादचा संशय घेत बेदम मारहाण केली. पीडित तरुणीलाही, तू दुसऱ्या धर्माच्या तरुणाबरोबर कशासाठी संबंध ठेवतेस म्हणून दमबाजी केली असता संबंधित तरुणीने जखमी तरुणाची बाजू घेत, आमचे कोणतेही अनैतिक संबंध नाहीत. आमच्यात कौटुंबिक आणि भाऊ-बहिणीसारखे जिव्हाळ्याचे संबंध असल्याचे समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. समाजात अनेक हिंदू मुला-मुलींचे दुसऱ्या धर्माच्या मुला-मुलींबरोबर काही कामानिमित्त संबंध येतच असतो. त्याकडे लव्ह जिहाद किंवा अनैतिक संबंध आहेत या नजरेने पाहू नये. वाटल्यास सत्यता पडताळण्यासाठी दोन्ही कुटुंबीयांना बोलावून घेऊ. पोलीस ठाण्यातही जाऊ, अशा शब्दांत पीडित तरुणीने समजावून सांगितले असता झुंड काहीही ऐकण्याच्या मनःस्थितीत नव्हती. उलट, जय श्रीरामचे नारे देत आणखी काही तरुणांना बोलावून घेण्यात आले. लव्ह जिहादचा संशय असलेल्या तरुणाला पुन्हा मारहाण करण्यात आली.

हेही वाचा – पुणे : मागासवर्गीयांच्या प्रश्नांबाबत राज्यव्यापी अनुसूचित जाती घटनात्मक हक्क संघर्ष समितीची स्थापना

या हल्ल्यानंतर जखमी तरुणाने पीडित तरुणीसह सदर बझार पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदविली. पीडित तरुणीनेही संबंधित झुंडीविरुद्ध तक्रार दिली. याप्रकरणी पोलीस निरीक्षक राघवेंद्रसिंह क्षीरसागर हे सखोल चौकशी करीत आहेत. जखमी तरुण आणि पीडित तरुणीचे लेखी तक्रारी अर्ज स्वीकारले असून, कायदा हातात घेऊन विनाकारण मारहाण करणाऱ्यांवर कठोर कारकाई करणार असल्याचे पोलीस निरीक्षक क्षीरसागर यांनी सांगितले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 07-03-2023 at 18:27 IST
ताज्या बातम्या