करोना टाळेबंदीत यूटय़ूबच्या माध्यमातून दर शनिवार, बुधवारी एक कविता सादर होणार

चंद्रपूर : कविता हा साहित्यातील, मनाला सर्वाधिक भावणारा सर्वात मृदू, तरलतम प्रकार होय. एखादी गोष्ट विस्ताराने गद्यात सांगण्यापेक्षा, कवितेतून अधिक पोहचते. ज्याला साहित्यातील तांत्रिक बाजू काहीही कळत नाही, अशा व्यक्तीलाही कविता भावते. रसांची नावे देखील ज्ञात नसलेली व्यक्तीही त्या त्या रसांचा आस्वाद घेत असते. लहान मूलही कवितेकडे आकर्षित होते. यामुळेच ती चटकन लक्षातही राहते. कवीला कविता कशी सुचते? विशिष्ट कविता सुचण्यामागची कहाणी काय? हे जाणून घेऊन ते रसिकांपर्यंत पोहचवण्यासाठी करोना टाळेबंदीच्या काळात चंद्रपुरातील साहित्यिकांनी एकत्र येत ‘कथा कवितेच्या जन्माची’ हा उपक्रम सुरू केला आहे. यूटय़ूबच्या माध्यमातून दर शनिवार आणि बुधवारी आपल्यासमोर एका कवीची एक कविता सादर केली जात आहे.

गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांच्या १६०व्या जयंतीचे औचित्य साधून या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली आहे. कवितांतील प्रतिमाचे आकलन, प्रत्येकाच्या अनुभव विश्वाशी जोडलेले असते. त्यामुळे पुष्कळदा आपल्याला आकलन झालेली कविता आणि कवीच्या मनातील भाव भिन्न असू शकतात. जसे कविवर्य सुरेश भटांची अत्यंत लोकप्रिय रचना ‘तरुण आहे रात्र अजुनी, तू असा निजलास कां’ ऐकताना विरह गीत वाटते, पण असे म्हणतात, की सुरेश भटांनी युद्धात शहीद झालेल्या पतीचे पार्थिव पाहून वीरपत्नीच्या मनात आलेले भाव यातून व्यक्त केले आहेत. असेच संदीप खरेंच्या ‘मी हजार चिंतांनी हे डोके खाजवतो, तो कट्टय़ावर बसतो, झुलतो शीळ वाजवतो’ या रचनेतही, दोन भिन्न वर्गातील व्यक्तींच्या एकाच परिस्थितीला सामोरे जाण्याच्या दृष्टिकोनातील फरक जाणवतो. पण कवीच्या म्हणण्याप्रमाणे त्यांनी यात एकाच व्यक्तीतील दोन भिन्न व्यक्तिमत्त्व चित्रित केलेले आहेत. कुठलाही अर्थ घेतला तरी रसिकांच्या आस्वादनात विशेष फरक पडत नाही. कारण प्रत्येक वेळी कवी आपल्याला उपलब्ध असेलच असे नाही. म्हणून कवीला कविता कशी सुचते? विशिष्ट कविता सुचण्यामागची कहाणी काय? हे जाणून घेऊन ते रसिकांपर्यंत पोहचवण्याचा आमचा हा प्रयत्न आहे.

‘कथा कवितेच्या जन्माची’च्या माध्यमातून प्रत्यक्ष कवीकडूनच ऐकवणार आहोत. तेव्हा याचा आपण आस्वाद घ्यावा आणि आपल्या प्रतिक्रिया कळवाव्या, जेणेकरून आपल्याला सर्वाच्या सामूहिक प्रयत्नातून अधिकाधिक आनंद घेता येईल. श्रीपाद जोशी, किशोर मुगल, पद्मरेखा धनकर, किशोर कवठे, अविनाश पोईनकर, इरफान शेख, देवानंद मेश्राम, प्रदीप देशमुख, गीता रायपुरे, मनोज बोबडे, प्रभाकर धोपटे, उर्मिला टिकले, नरेशकुमार बोरीकर, विजय वाटेकर, किशोर जामदार या कवींच्या प्रत्येकी पाच कविता सादर होणार आहेत. या निर्मितीची संकल्पना आणि मांडणी किशोर जामदार, संपादन आणि दिग्दर्शन नचिकेत जामदार, छायांकन अमोल मेश्राम व राममिलन सोनकर आणि ग्राफिक्स विक्रांत नवाथे यांचे आहे. आकार फिल्म्स अ‍ॅन्ड डिजिटलच्या यूटय़ूब चॅनलवर हा कार्यक्रम उपलब्ध आहे.