लहान मुले कधी काय तोंडात घालतील आणि त्यामुळे त्यांच्यावर काय आपत्ती येईल सांगता येत नाही. कधी नाणे, तर कधी एखादा धातूची वस्तू तोंडात घालून ती अडकल्याने अतिशय गंभीर परिस्थिती निर्माण होते. अशीच एक घटना नुकतीच चिपळूण येथे घडली आहे. ७ महिन्याच्या अरिबाने खेळता खेळता चुकून एलईडी बल्ब गिळला. तिने दोरा किंवा दुसरी कोणतीतरी वस्तू गिळली असावी असे पालकांना वाटले. त्यांनी काही प्रमाणात घरगुती पद्धतीने गिळलेला पदार्थ काढण्याचा प्रयत्नही केला मात्र ही वस्तू बाहेर न निघता गिळली गेली.

त्यानंतर अरिबाला खूप खोकला आणि ताप येऊ लागला. त्यामुळे पालक तिला स्थानिक डॉक्टरांकडे घेऊन गेले. त्यांनी उपचार केल्यानंतरही काहीच फरक न पडल्याने डॉक्टरांनी तिचा एक्स-रे काढला. यावेी तिच्या उजव्या बाजूच्या फुफ्फुसामध्ये बाह्यघटक असल्याचे दिसून आले. पुढच्या उपचारांसाठी या चिमुकलीला बाई जेरबाई वाडिया बालरुग्णालयात दाखल केले. येथील डॉक्टरांनी ब्लाँकोस्कोपी करुन अवघ्या २ मिनिटांत हा बल्ब बाहेर काढला.

हॉस्पिटलच्या ईएनटी (कान-नाक-खसा) विभागाचे प्रमुख डॉ. दिव्या प्रभावत म्हणाल्या, ब्रॉन्कोस्कोपी केली गेली तेव्हा बाह्यघटक बरेच दिवस फुफ्फुसामध्ये असल्याने संसर्ग होण्याची शक्यता होती. त्यामुळे प्रतिजैविके आणि स्टेरॉईडस देऊन ही शस्त्रक्रिया करायचे ठरले. त्यानंतर पुन्हा एकदा ब्राँकोस्कोपी केली हा बाह्यघटक बाहेर काढण्यात आला. आश्चर्य म्हणजे तो २ सेंटिमीटरचा एलईडी बल्ब होता. अशाप्रकारची ही पहिलीच घटना असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे होते. परंतु पालकांनी घरात लहान मुले असल्यास त्यांच्याकडे अतिशय बारकाईने लक्ष द्यायला हवे, अन्यथा अशाप्रकारच्या घटना जीवावर बेतू शकतात असेही ते म्हणाले.