सोलापूर : मेंदूची अपुरी वाढ, सेरेब्रल पाल्सी, बहुविकलांगपणा यामुळे सामान्य मुलांपेक्षा विकासाची गती संथ असलेल्या मुलांचे आयुष्य संघर्षमय असते. पण मानसिकदृष्ट्या कमजोर असले तरी या मुलांच्या आयुष्याला आकार देता येईल, या भावनेतून गेल्या १५ वर्षांपासून दक्षिण सोलापूर तालुक्यातील कुंभारी येथे ‘आधार मागासवर्गीय महिला संस्था’ कार्यरत आहे. ‘आधार मतिमंद निवासी विद्यालय’ नावाने चालवण्यात येणारे या संस्थेचे निवासी विद्यालय अशा मुलांसाठी देवदूत ठरले आहे.

संस्थेचे संस्थापक जगदीश कलकेरी आणि शुभांगी कलकेरी यांनी कोणत्याही शासकीय अनुदानाशिवाय, पूर्णपणे स्वत:च्या खर्चाने हे निवासी विद्यालय सुरू केले आहे. आजवर संस्थेला चालविण्यासाठी त्यांनी स्वत:ची शेतीची जमीन, घराची जागा, वाहन, दागिने अशा वैयक्तिक मालमत्तेचा त्याग केला. मतिमंद मुलांसाठी केवळ निवासी विद्यालय चालविले जात नाही तर मोफत निवास, अन्न, शिक्षण आणि वैद्याकीय सेवा, बौद्धिक विकास आणि व्यावसायिक प्रशिक्षण, दैनंदिन जीवन कौशल्य शिकविणे, समाजात कसे वागावे याचे मार्गदर्शन या माध्यमातून मतिमंद मुलांचा आत्मविश्वास वाढविण्याचा प्रयत्न केला जातो. त्यांच्या सुप्त गुणांना वाव मिळावा यासाठी विविध प्रयोग आणि उपक्रम राबविले जातात.

आजवर २५ मुलांना शाळेतून कौशल्य प्रशिक्षण देऊन लहान सहान रोजगारांशी जोडण्यात आले आहे. पणत्या बनविणे, राख्या बनविणे, मेणबत्ती बनविणे, मंदिरातील निर्माल्यापासून अगरबत्ती बनविणे, धूप बनविणे, होळीसाठी रंग व पत्रावळी बनविणे व पेपर बॅग बनविण्यापासून अशा कौशल्यावर आधारित त्यांना स्वावलंबनाचे प्रशिक्षण कार्य केले जाते. एवढेच नव्हे तर २५ मुले स्वावलंबी झाली आहेत. बेकरीत, किराणा दुकानात, शिवणकाम करून, झेरॉक्स दुकान, बांधकाम मजुरी करून ही मतिमंद मुले स्वावलंबी झाली आहेत. सध्या पाच वर्षांच्या मुलांपासून अगदी ५० वर्षे व्यक्तीला राहता येईल, अशी व्यवस्था करण्यात आली आहे.

गेल्या काही वर्षांत अन्नधान्य, औषधे, कर्मचाऱ्यांचे मानधन, इमारतीचा दुरुस्ती आदी खर्च प्रचंड वाढले आहेत. कोविड काळानंतर तर आर्थिक आव्हाने अधिकच गंभीर झाली आहेत. संस्थेला आता मुलांसाठी सुरक्षित आणि कायमस्वरूपी इमारत उभारायची आहे. केवळ शिक्षण, प्रशिक्षण, स्वावलंबनापुरता विचार न करता आयुष्यभर या मुलांचा सांभाळ करावयाचा आहे.