शहरात गोदा काठावर रिलायन्स फाऊंडेशनच्या मदतीने साकारला जाणाऱ्या गोदा उद्यान प्रकल्पाच्या भूमिपूजनाच्या निमित्ताने मनसे-भाजपमध्ये दीड महिन्यांपासून निर्माण झालेला बेबनाव दूर होण्याची चिन्हे असली तरी आगामी लोकसभा निवडणुकीत हेच उद्यान सर्व राजकीय पक्षांचा प्रमुख मुद्दा राहणार आहे. कारण, राष्ट्रवादी काँग्रेसने या प्रकल्पास आधीच विरोध दर्शविला असताना आता शनिवारी भूमिपूजन सोहळ्यावेळी आम आदमी पक्ष आंदोलन करणार आहे.
दीड महिन्यांपूर्वी राज ठाकरे यांनी नरेंद्र मोदी यांच्यावर साधलेल्या शरसंधानामुळे महापालिकेत सत्तासुख घेणाऱ्या मनसे-भाजपमध्ये चांगलेच बिनसले होते. तेव्हापासून भाजपचे स्थानिक पदाधिकारी राज वा मनसेच्या कार्यक्रमांवर बहिष्कार टाकत आहेत. लोकसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर, सध्या सर्वच राजकीय पक्ष भूमिपूजन वा विकास कामांच्या उद्घाटनाचा एककलमी कार्यक्रम राबवित आहे. मनसेही त्यास अपवाद ठरली नाही. शनिवारी राज यांच्या उपस्थितीत गोदा उद्यानाचे भूमिपूजन होणार आहे. नेमक्या याच दिवशी भाजपचे माजी अध्यक्ष नितीन गडकरी विविध कार्यक्रमांनिमित्त नाशिकमध्ये असल्याने त्यांनी उद्यानाच्या कार्यक्रमास उपस्थित रहावे, असा मनसेचा प्रयत्न होता. खुद्द गडकरी यांनी मनसेची मागणी मान्य करून भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांना धक्का दिला. या निमित्ताने द्विपक्षी ‘दिलजमाई’ होणार असल्याचे अधोरेखीत झाले आहे.
पालिकेतील सत्ताधारी मनसे व भाजपमध्ये मनोमीलन करण्यात गोदा उद्यान प्रमुख भूमिका वठविणार असला तरी या प्रकल्पास राष्ट्रवादी काँग्रेस व आम आदमी पक्षाने विरोध करण्याचे ठरविले आहे. सर्वसाधारण सभेत प्रेक्षागृहातून राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत या कामास विरोध दर्शविला. मखमलाबाद शिवारात गोदाकाठी होणाऱ्या भूमिपूजन कार्यक्रमास आंदोलनाद्वारे विरोध केला जाणार असल्याचे आपने म्हटले आहे.