भारिप नेते प्रकाश आंबेडकर यांच्या महाराष्ट्र लोकशाही आघाडीसोबत समझोता झाल्यास राज्यातील लोकसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाचा फायदा होईल, असे ‘आप’चे जालना लोकसभा मतदारसंघातील उमेदवार दिलीप म्हस्के यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
प्रकाश आंबेडकर यांना आपण यापूर्वी भेटलो आहोत. त्यांचा व ‘आप’चा निवडणूक समझोता झाल्यास आपणास आनंदच होईल. समाजसेवा व देशसेवा करण्याचे राजकारण हे महत्त्वाचे माध्यम आहे, असे आपण मानतो. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे गुरुवारी जालना जिल्ह्य़ात होते. त्यांना निवडणुकीत आशीर्वाद मागितले असता त्यांनी राळेगणसिद्धी येथे येऊन भेटण्यास सांगितल्याचे म्हस्के म्हणाले. आपल्या प्रचारासाठी अरविंद केजरीवाल, मयांक गांधी, योगेंद्र यादव आदी नेते येणार आहेत. जनतेस आवश्यक सुविधा उपलब्ध करण्याच्या उद्देशाने मी निवडणूक लढवत आहे. जालना मतदारसंघात ३५ हजार व्यक्तींनी स्वयंस्फूर्तीने ‘आप’चे सदस्यत्व स्वीकारले आहे. हे सदस्य प्रचारात महत्त्वाचे काम करणार आहे. या शिवाय आपण माजी विद्यार्थी असलेल्या देशाभरातील विविध नवोदय विद्यालयांचे विद्यार्थी प्रचारात उतरणार आहेत, असेही त्यांनी सांगितले. ‘आप’चे जिल्हा समन्वयक कैलास फुलारी व अन्य पदाधिकारी या वेळी उपस्थित होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Aap rpi election prakash ambedkar
First published on: 08-03-2014 at 01:55 IST