विवाहित महिलेचे अपहरण करून, तिला पोत्यात कोंबून नगर तालुक्यातील विळद परिसरातील रेल्वे रु ळावर टाकण्याचा धक्कादायक प्रकार काल, गुरुवारी रात्री घडला. या संदर्भात एमआयडीसी पोलिसांनी सहा जणांविरुद्ध खुनाचा प्रयत्न व अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे. आज, शुक्रवारी रात्रीपर्यंत कोणाला अटक करण्यात आली नव्हती. अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक बोरसे करत आहेत.

तुषार अर्जुन वाघ, बंडू हिराजी मतकर, सुभाष कराळे, अर्जुन वाघ, अरु ण मतकर, दिलीप नगरे (सर्व रा. जवखेडे खालसा, ता. पाथर्डी) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या तीस वर्षीय महिलेवर दोन वर्षांंपूर्वी अत्याचार करण्याचा प्रकार घडला. त्याबाबत तीने दिलेल्या फिर्यादीनुसार शहरातील तोफखाना पोलीस ठाण्यात १३ जणांवर अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यात वरील सहा जणांचा समावेश आहे. फिर्यादी महिलाही आरोपींच्याच गावातील आहे. पूर्वी अत्याचाराचा गुन्हा दाखल केल्याचा राग धरून वरील सहा जणांनी आपले अपहरण करून, रेल्वे रुळावर टाकल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे.

ही महिला पूर्वी नगर शहरात राहत होती. नंतर ती एमआयडीसी जवळील गजानन वसाहतीत राहण्यास गेली. काल सायंकाळी ती भाजी आणण्यासाठी बाहेर पडली असता, वरील सहा जणांनी अपहरण करून, हातपाय बांधून पोत्यात कोंबून विळद येथील रेल्वे रुळावर आणून टाकल्याची तक्रार तिने दिली आहे. जखमी व बांधून टाकलेल्या अवस्थेतील ही महिला विळदच्या ग्रामस्थांना आढळली, त्यांनी ही माहिती एमआयडीसी पोलिसांना कळवली. पोलिसांनी तिला ताब्यात घेतले व तिने दिलेल्या फिर्यादीवरून वरील सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.