संगीतरत्न अब्दुल करीम खाँसाहेब यांचा अर्धपुतळा रविवारी राडारोडय़ातून मुक्त करण्यात आला. याबाबत ‘लोकसत्ता’ने प्रसिध्द केलेल्या वृत्ताची दखल घेऊन महापालिका प्रशासनाने ही तातडीची कारवाई केली. मात्र या पुतळ्याला खेटूनच होत असलेल्या बांधकामाला परवाना कसा देण्यात आला याची चौकशी करण्यात येत असल्याची माहिती उपायुक्त स्फूर्ती पाटील यांनी दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

खाँसाहेबांच्या पुतळ्यालगत सध्या बांधकाम सुरू असून यासाठी सुमारे दहा फूट खड्डा काढण्यात आला असून बांधकामासाठी लागणारी खडी, वाळू याचा ढीग पुतळ्यासमोरच टाकण्यात आला होता. तसेच खुदाईचा मुरूमही पुतळ्याच्या बाजूलाच ठेवण्यात आला. याबाबत ‘लोकसत्ता’ने रविवारी वृत्त प्रसिध्द होताच जाग आलेल्या प्रशासनाने तत्काळ हालचाली करून संबंधित बिल्डरला खडी, वाळू हटविण्याचे आदेश दिले. यामुळे राडारोडा हटविण्यात येऊन पुतळा परिसर स्वच्छ करण्यात आला.

मात्र, ज्या जागेवर बांधकाम करण्यात येत आहे ती जागा रस्ता रूंदीकरणासाठी महापालिकेने आरक्षित केली आहे. याशिवाय हा मार्ग रत्नागिरी नागपूर या राष्ट्रीय महामार्गाचा भाग असताना जागेच्या बाहेर जाऊन महामार्गालगत खुदाई करण्यात आली आहे.

तसेच या जागेला पत्र्याचे कुंपण घालण्यासाठी महामार्गाची जागा वापरण्यात आली असल्याचे स्पष्ट दिसत आहे. मुळात महापालिकेने ही जागा रस्ता रूंदीकरणासाठी आरक्षित केली असताना बांधकाम परवानाच कसा देण्यात आला याची चौकशी करण्यात येणार असल्याचे उपायुक्त श्रीमती पाटील यांनी सांगितले.

 

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Abdul karim khan saheb statue part
First published on: 27-03-2017 at 01:18 IST