कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी लष्करी जवानाच्या अख्खा भूखंडच गिळला असल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले आहे. यावरून ठाकरे गटाचे प्रवक्ते संजय राऊत यांनी कृषीमंत्री अब्दुल सत्तार आणि गृहंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर घणाघात केला आहे.

गेल्या काही दिवसांपासून अब्दुल सत्तार वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. कृषी विभागातील बदली, पोलिसांनी नकार देऊनही पंढरपुरात आषाढी एकादशीलाच शेतकरी मेळावा घेण्यासाठी घातलेला घाट, पीए प्रकरण यामुळे अब्दुल सत्तार अडचणीत आले आहेत. आता, त्यांनी सिल्लोड येथे मेडिकल कॉलेजच्या उभारणीकरता जमीन हस्तांतरण प्रक्रिया सुरू केली आहे. या जागेवर योगेश गोराडे या लष्करी विभागातील जवानाचीही जमीन आहे. त्याच्याकडून अनधिकृतरित्या जमीन बळकवण्याचा प्रयत्न होत असल्याचे वृत्त आहे. त्यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रारही प्राप्त झाली आहे. जिल्हाधिकाऱ्यांकडे प्राप्त झालेल्या पत्राचा दाखला देत संजय राऊतांनी देवेंद्र फडणवीसांना थेट आव्हान दिलं आहे.

हेही वाचा >> “दीपक गवळी स्वीय सहाय्यक नाही, तर…”, वादग्रस्त छापेमारीवर अब्दुल सत्तारांचं स्पष्टीकरण

“दे.भ. देवेंद्रजी, हे खरे आहे? औरंगजेबाचा बंदोबस्त नंतर करू. आधी या औरंग्याच्या पेकाटात लाथ घाला. भारतीय सीमेवर लढणाऱ्या सैनिकांची लूट सुरू आहे. काय करताय बोला?” असा थेट सवाल संजय राऊतांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना विचारला आहे. आज सकाळीच त्यांनी हे ट्वीट केलं आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नेमकं प्रकरण काय?

अब्दुल सत्तार यांचा कथित स्वीय्य सहाय्यक दीपक गवळी याच्या पथकाने टाकलेला अकोला शहरातील औद्योगिक वसाहतीतील कृषी खत कंपनीवरील छापा याप्रकरणी ते अडचणीत सापडलेले असतानाच हा प्रकार समोर आला आहे. दैनिक सामानाने दिलेल्या वृत्तानुसार, “सिल्लोड येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाच्या पाठीमागे गट क्रम ९२ मध्ये २००७ मध्ये नॅशनल एज्युकेशन सोसायटी स्थापन करण्यात आली. समीर अहमद हा अब्दुल सत्तारांचा नातलग या सोसायटीचा कर्ताधर्ता आहे. सोसायटीत एकूण २०५ भूखंड असून खरेदीदारांना रीतसर खरेदीखत करून सातबारावरही त्याची नोंद घेण्यात आली. कालांतराने अब्दुल सत्तार यांना मेडिकल कॉलेजला परवानगी मिळाली. या मेडिकल कॉलेजला जागा मिळवण्यासाठी अब्दुल सत्तार आणि त्यांच्या दोन मुलांनी सोसायटीतील प्लॉटधारकांचा छळ मांडला आहे. त्यात, या लष्करी जवानाचाही समावेश आहे.”