शिवसेनेतील बंडाळीनंतर राज्यात सत्तापालट झालं आणि एकनाथ शिंदें-देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली नवीन सरकार स्थापन झालं. यानंतर राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत शिवसेनेनं रालोआच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा द्यावा, अशी विनंती शिवसेनेचे खासदार करू लागले आहेत. त्यामुळे उद्धव ठाकरेंसमोरचा पेच अजूनच वाढला असताना आनंदराव अडसूळ यांनी पक्षनेतेपदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे आता ते देखील शिंदे गटात सामील होणार का? अशी चर्चा सुरू झालेली असतानाच त्यांचे पुत्र अभिजीत अडसूळ यांनी केलेल्या सूचक विधानामुळे आनंदराव अडसूळ यांच्या राजकीय भवितव्याविषयी जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

आनंद अडसूळ गेल्या काही काळात ईडीच्या टार्गेटवर होते. त्यांना बजावण्यात आलेल्या ईडीच्या नोटिसांची देखील बरीच चर्चा झाली होती. दुसरीकडे ईडी-सीबीआयच्या भितीखाली शिवसेनेतील बंडखोर आमदार शिंदे गटात सामील झाल्याचा आरोप शिवसेनेकडून करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर आनंद अडसूळ यांनी शिंदे गटाच्या बाजूने भूमिका मांडली असताना ते देखील बंडखोर आमदारांसोबत सरकारमध्ये सहभागी होणार का? असा प्रश्न विचारला जात होता. या पार्श्वभूमीवर अभिजीत अडसूळ यांचं विधान महत्त्वाचं मानलं जात आहे.

“एकनाथ शिंदे दाखवतील त्याच मार्गाने जाणार”

आनंद अडसूळ यांनी राजीनामा दिल्यानंतर त्यावरून संजय राऊतांनी ईडीच्या दबावाखाली त्यांनी राजीनामा दिल्याचा संदर्भ देत भाजपावर टीका केली होती. त्यासंदर्भात बोलताना त्यांचे पुत्र अभिजीत अडसूळ यांनी माध्यमांशी बोलताना यासंदर्भात भूमिका स्पष्ट केली. “शिंदे गट म्हणून नाही. पण गेल्या कित्येक वर्षांपासून एकनाथ शिंदे जेव्हा मंत्री होते, तेव्हा मी हक्काने त्यांच्याकडे जायचो. अगदी रात्री २ वाजता देखील त्यांच्याकडे गेलो, तरी त्यांचे दरवाजे उघडे असायचे. त्यामुळे गट-तट मी मानले नाहीत. मी शिवसैनिक आहे. एकनाथ शिंदे दाखवतील, त्या दिशेने चालणारा मी शिवसेना कार्यकर्ता आहे”, असं अभिजीत अडसूळ यावेळी म्हणाले.

उद्धव ठाकरेंना आणखी मोठा धक्का, ठाण्यानंतर नवी मुंबईतील नगरसेवक शिंदे गटात सामील होणार?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

काय म्हणाले होते संजय राऊत?

आज सकाळी संजय राऊतांनी पत्रकार परिषदेत बोलताना अडसूळांच्या राजीनाम्यावर प्रतिक्रिया दिली होती. “अडसूळांवर ईडीची कारवाई सुरू होती. ते म्हणत होते की करावाई चुकीची आहे. तरीही त्यांच्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याचा ईडीचा प्रयत्न होता असं ते म्हणत होते. भाजपाचे काही नेते ईडीच्या माध्यमातून त्यांना अटक करण्याची भाषा करत होते. अनेक नेत्यांवर अशा प्रकारचा दबाव आहे. आज तुमच्या माध्यमातून मला कळतंय की त्यांनी राजीनामा दिला आहे”, असं संजय राऊत म्हणाले होते.