उत्तर भारतीयांशिवाय महाराष्ट्राचा विकास होणे शक्य नसल्यामुळे त्यांच्या रक्षणाची जबाबदारी राज्यातील उत्तर भारतीय नागरिक घेणार असून ज्यांच्यात धमक आहे त्यांनी आता मुंबईत येणाऱ्या उत्तर भारतीयांना रोखूनच दाखवावे, असे अप्रत्यक्ष आव्हान समाजवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष अबू आझमी यांनी रविवारी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांना दिल्याने नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.
उत्तर भारतीय संघातर्फे कस्तुरचंद पार्कवर आयोजित करण्यात आलेल्या मेळाव्यात अबू आझमी बोलत होते. बिहार, उत्तर प्रदेश या राज्यांतून मोठय़ा प्रमाणात रोजगारासाठी मुंबई आणि महाराष्ट्रातील विविध भागांत उत्तर भारतीय स्थायिक झाले आहेत. उत्तर भारतीय प्रचंड मेहनत करीत असून महाराष्ट्राच्या विकासात त्यांचे मोठे योगदान आहे. महाराष्ट्राचा विकास हा उत्तर भारतीयांशिवाय होऊ शकत नाही. मात्र गेल्या काही वर्षांत काही राजकीय पक्षाचे नेते उत्तर भारतीय आणि मराठी माणसांमध्ये भांडणे लावण्याचे काम करीत आहेत, असा आरोप आझमी यांनी केला. मुंबईतील मराठी माणसाला सहकार्य करणारा हा उत्तर भारतीयच आहे, मात्र उत्तर भारतीयांवर हल्ले करून अपमानित केले जात आहे. विधानसभेत हिंदी भाषेला विरोध करण्यात आला त्यावेळी सभागृहात आवाज उठवला मात्र त्याला ज्यांची काही लायकी नाही अशा महाराष्ट्रातील काही नेत्यांनी विरोध केला. माझ्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. काही नेते लायकी नसताना मुंबई महानगरात सत्ता गाजविण्याचा प्रयत्न करीत आहेत. मात्र उत्तर भारतीय ते कदापी सहन करणार नाहीत. उत्तर प्रदेश आणि बिहारमधून येणाऱ्या काळात उत्तर भारतीय रोजगारासाठी येणारच असून त्यांना रोखून दाखवावे, असे आव्हान आझमी यांनी दिले. अकोलामध्ये काही राजकीय पक्षांनी उत्तर भारतीयांवर हल्ले करण्याचा प्रयत्न केला मात्र त्याला उत्तर भारतीयांनी उत्तर दिले. महाराष्ट्रात उत्तर भारतीय सन्मानाने राहून जीवन जगेल. उत्तर भारतीयांनी काम बंद केले तर महाराष्ट्राचा विकास ठप्प होईल. त्यामुळे उत्तर भारतीयांशिवाय महाराष्ट्राला पर्याय नाही, असेही आझमी म्हणाले.