कोल्हापुरातील गडहिंग्लज तालुक्यातील दोन अपघातात सात जण ठार झाले. यामध्ये लोकसभा निवडणुकीचा प्रचार आटोपून परत निघालेल्या राजकीय पक्षांच्या चार कार्यकर्त्यांचा समावेश आहे. हा अपघात शनिवारी संध्याकाळच्या सुमारास घडला. तर ,अन्य एका अपघातात मोटार झाडावर आदळून दोघेजण ठार झाले. मोटार अपघातातील वासंती मारुती नांदवडेकर, मुलगा सोहम मारुती नांदवडेकर यांचा मृत्यू झाला. तर, सुमो – एसटी यांच्यात धडक होऊन सुमो मधून प्रवास करणारे आप्पा सुपले, चंद्रकात गरूड, मनोज चव्हाण, नामदेव चव्हाण (सर्व रा. नूल ता. गडहिंग्लज) यांचा जागीच मृत्यू झाला. बसमधून प्रवास करणाऱ्यांमधील मारुती नांदवडेकर, दिलीप सुपले, राहुल सावंत, राजू जाधव यांच्यासह वीस प्रवासी जखमी झाले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार , शनिवारी सकाळी नेसरी येथील मारुती नांदवडेकर हे आईच्या अंत्यसंस्कारासाठी पुण्याहून अल्टो मोटारीतून गावी येत होते . पहाटे पाच वाजता महागावनजीक ते आले असता त्यांचा मोटारीवरील ताबा सुटला. गाडी रस्त्याकडे असलेल्या झाडाला धडकली. त्यात पत्नी वासंती आणि मुलगा सोहम यांचा जागीच मृत्यू झाला.  संध्याकाळी झालेल्या अन्य एका अपघातात प्रचारासाठी गेलेल्या कार्यकर्त्यांना मृत्यूने गाठले. लोकसभा निवडणुकीनिमित्त गजरगाव येथील मेळावा आटोपून नूल येथील एका राजकीय पक्षाचे कार्यकर्ते परत निघाले होते.याचवेळी पावसाला सुरुवात झाली. हलक्या सरी सुरू झाल्याने रस्ता निसरडा झाला होता. ज्यामुळे एसटीचालकाचा ताबा सुटून ती सुमो मोटारीवर जोराने आदळली. एसटीच्या धडकेने मोटार काही अंतर फरफटत गेली. यात सुमोमधील पाच जण जागीच ठार झाले. तर, अन्य दोघे जखमी झाले. या अपघातात बसमधील वीस प्रवासी जखमी झाले. सर्व जखमींना तातडीने उपचारासाठी उपजिल्हारूग्णालय येथे हलविण्यात आले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Accident in gadhinglaj kolhapur 7 killed 20 injured
First published on: 13-04-2019 at 21:18 IST