मुंबई-आग्रा महामार्गावर आज सकाळी तीन ट्रक आणि एक कार यांच्यामध्ये विचित्र अपघात झाला. यामध्ये कारमधील प्रवासी आणि ट्रकमधील परप्रांतीय मजूर असे १५ ते २० जण जखमी झाले आहेत.
सुत्रांच्या माहितीनुसार, मुंबई-आग्रा महामार्गावर चांदवड शहरापासून जवळ असलेल्या राहुड घाटात परप्रांतीय मजुरांना घेऊन जाणाऱ्या तीन ट्रक व एक स्विफ्ट कारचा भीषण अपघात झाला. यात पंधरा ते वीस लोक जखमी झाले असून एक चालक गंभीर जखमी झाला आहे.
सकाळी सव्वाआठच्या सुमारास हा अपघात झाला. अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली. दोन ते तीन किलोमीटर वाहनांच्या रांगा लागल्या. यामुळे मदत कार्यात अडथळे आले. सर्वच यंत्रणांची धावपळ उडाली. जखमींना रुग्णवाहिकेने चांदवड उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून पुढील उपचार सुरू आहेत.