पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर अपघातप्रवण जागांची पाहणी करण्यासाठी गेलेले रस्ते विकास महामंडळाचे (एमएसआरडीसी) मुख्य अभियंता अरूण देवधर आणि कार्यकारी अभियंता ए. पी. एॅब्रोल यांच्या मोटारीला पवना पोलीस चौकीसमोर शुक्रवारी सायंकाळी सव्वापाचच्या सुमारास अपघात झाला. या अपघातामध्ये दोघेही किरकोळ जखमी झाले असून त्यांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले आहे. गेल्या काही दिवसांतील पवना चौकीजवळचा हा तिसरा अपघात आहे.
महामार्ग विभागाचे पोलीस अधीक्षक दिलीप भुजबळ यांनी दिलेल्या माहितीनुसार, देवधर व एॅब्रोल हे द्रुतगती मार्गावरील अपघातप्रवण जागांची पाहणी  करत होते. कामशेत बोगद्यानंतर पवना पोलीस चौकीसमोर त्यांची इंडिगो मोटार कमी वेगात जात असताना पाठीमागून आलेल्या झायलो मोटारीने पाठीमागून धडक दिली. यामध्ये त्यांना किरकोळ जखम झाली असून उपचारानंतर त्यांना घरी सोडण्यात आले आहे.