नगर शहरातील भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते विरोधकांमध्येच विखुरले आहेत. पक्षाचे अनेक कार्यकर्ते शिवसेनेच्याच प्रचारात उघडपणे सक्रिय झाले आहेत, तर एक मोठा गट राष्ट्रवादीच्या छुप्या प्रचारात असल्याचे पक्षातच बोलले जाते. या प्रकाराने पक्षात आता हतबलताच वाढीला लागली आहे.
भाजप-शिवसेना युती तुटल्यानंतर भाजने शहर मतदारसंघात पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष तथा नगरसेवक अभय आगरकर यांना उमेदवारी दिली आहे. शहरात गेली पंचवीस वर्षे आमदार अनिल राठोड हेच शिवसेनेचे आमदार आहेत. त्यांच्याच कारणावरून भाजपमध्ये अनेक वर्षांपासून दुफळी आहे. मात्र भाजपचे काही कार्यकर्ते त्यांच्याशी जवळीक साधून आहेत. मुळातच तीनचार गटांत विखुरलेल्या भाजपमध्ये विधानसभेच्या नगर शहर मतदारसंघावरून राठोड यांच्याशी वितुष्ट आहे. येथे भाजपला संधी नसल्याचे शल्य अनेक कार्यकर्त्यांमध्ये होते. त्यामुळेच मिळणार नाही, हे माहीत असूनही प्रत्येक विधानसभा निवडणुकीत भाजपने या जागेवर दावा केला होता. याही वेळी भाजपने नगर शहराच्या जागेची मागणी केली होतीच.
आता युती तुटली असली, तरी या पाश्र्वभूमीवर पक्षात अजूनही गटबाजीच सुरू आहे. या निवडणुकीत शहर मतदारसंघात पक्षाचा अधिकृत उमेदवार असतानाही काही कार्यकर्ते राठोड यांच्याच प्रचारात उघडपणे सक्रिय आहेत. यात काही जुन्या कार्यकर्त्यांचाही समावेश आहे. आगरकर यांना विरोध म्हणूनच हे कार्यकर्ते राठोड यांच्या प्रचारात आघाडीवर आहेत. एका ज्येष्ठ नेत्यानेच याबाबत बोलताना ‘शिवसेनेचेही काही कार्यकर्ते आमच्या प्रचारात आहेत’ असे सांगून या गोष्टीला एका अर्थाने दुजोराच दिला आहे. दुसरा एक गट राष्ट्रवादीचे उमेदवार संग्राम जगताप यांच्या छुप्या प्रचारात असल्याची चर्चा पक्षाच्याच वर्तुळात सुरू आहे. शिवाय अनेक जण सक्रिय प्रचारापासून अलिप्त आहेत. निवडणूक आता काही दिवसांवर आली असताना या सगळय़ा हालचालींमुळे पक्षात हतबलताच व्यक्त होऊ लागली आहे.