ज्येष्ठ अभिनेते श्रीराम लागू यांचे मंगळवारी १७ डिसेंबर रोजी वयाच्या ९२व्या वर्षी निधन झाले. त्यामुळे संपूर्ण मराठी चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे. नुकताच अमेय वाघने लोकसत्ता ऑनलाइनशी बोलताना लागूंच्या निधनाचे दु:ख व्यक्त केले आहे.

‘लागू यांच्या निधनाची बातमी कळली आणि ऐकून मला फार वाईट वाटलं. मी त्यांच्या इतका जवळचा नसलो तरी सुद्धा माझ्यात आणि त्यांच्यात काही नातं असल्याचे मला कायम वाटायचं. कारण मी नटसम्राटमध्ये त्यांच्यासोबत काम केले होते. मला असं वाटतं की आजची जी माझी पिढी आहे त्यात अभिनय आणि कला जरा करप्ट झाले आहे. लोकांना असं वाटतं की टिक-टॉकवर व्हिडीओ केले किंवा सोशल मीडियावर सक्रिय राहिलो, जीमला गेलो, पार्लरला गेलो की आपण अभिनेते होतो. पण डॉ. लागूंनी एका अर्थी आपल्या चित्रपटसृष्टीमध्ये क्रांती घडवली. ती म्हणजे नटाने अॅथलेट आणि फिलॉसॉफर असणे अत्यंत गरजेचे आहे’ असे अमेय म्हणाला.

एखादा शास्त्रीय गायक जसा रियाज करतो, स्वत:वर काम करतो आणि मगच त्याची कला प्रेक्षकांसमोर सादर करतो. डॉ. लागूदेखील याच मताचे होते. नटाने देखील रियाज करत राहणे गरजेचे आहे. नट म्हणून त्याने त्याच्या कौशल्याचा, कलेचा रियाज करत राहणं ही संस्कृती लागूंनी आपल्याकडे आणली असे मला वाटते’ अमेय पुढे म्हणाला.

‘मी १७ वर्षांचा होतो. तेव्हा कॉलेजमध्ये एकांकीका वैगरे करत होतो. त्यावेळी लागू यांच्यासोबत काम केल्यावर मला जाणवलं कि ते का इतके मोठे नट होते. कारण ते फक्त स्वत:च काम कसं चांगलं होईल याकडेच लक्ष देत नव्हते तर बरोबरीच्या लोकांचे काम कसं चांगलं होईल यासाठी देखील त्यांचा प्रयत्न सुरु असायचा. त्यामुळे त्यांना गमावणे हे चित्रपटसृष्टीचे खूप मोठे नुकसान आहे. पुढच्या अनेक वर्षांमध्ये असा नट होणे नाही’ असे अमेय पुढे म्हणाला.